‘आमची बालके आमची जबाबदारी’ अभियानाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:35+5:302021-06-18T04:13:35+5:30
जिल्ह्यातील बालकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग आणि पंचायत ...
जिल्ह्यातील बालकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग आणि पंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन गुरुवारी परभणी येथे सीईओ टाकसाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शोभाताई घाटगे, आरोग्य व शिक्षण सभापती अंजलीताई आणेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, मंजूषा कापसे, ओमप्रकाश यादव, आरोग्य उपसंचालक डॉ. गायकवाड, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी सीईओ टाकसाळे यांनी जिल्हा परिषदेच्या चार विभागांमार्फत हे अभियान यशस्वी करू, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले. यावेळी त्यांनी अभियानाचा उद्देश, अभियानादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी, गावपातळीवर स्थापन करण्यात येणारी पथके आणि तालुका व जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती याबाबत माहिती दिली. तसेच या अभियानावर होणारा खर्च संबंधित विभागाने आपल्या निधीतून करायचा असून याबाबतचा जास्तीतजास्त भार पंचायत विभाग उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या अभियानात गावपातळीवर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन करण्यात येणार असून ते पथक ० ते १८ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचा सर्व्हे करून जी बालके तीव्र कुपोषित किंवा विविध आजारांनी ग्रस्त आहेत, अशा बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करणार आहे. तसेच अशा बालकांवर सतत तीन महिने लक्ष ठेवत विशेष उपचार करण्यात येतील, असे ते म्हणाले. पाथरी आणि मानवत तालुक्यांतील ५० अंगणवाडी केंद्रांमध्ये पालवी हा अनौपचारिक शिक्षणासाठी उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमासाठी एसटी पारीख फाउंडेशन यांच्या वतीने निधी देण्यात येतो. त्यांच्या वतीने अंगणवाडीसेविकांना टॅबचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी कांबळे यांनी केले.