गावगाड्यातील पुढाऱ्यांचा लागला कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:41+5:302021-01-20T04:18:41+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक समजला जातो. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये प्रवेश करणारे पुढारी गावपातळीवरील ग्रामपंचायतमध्ये अगोदर ...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक समजला जातो. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये प्रवेश करणारे पुढारी गावपातळीवरील ग्रामपंचायतमध्ये अगोदर नशीब अजमावून पुढे जातात. एकदा गावावर कमांड बसवली की तालुक्याच्या राजकारणात महत्त्व प्राप्त होते. त्याचबरोबर पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना लोकसंख्याच्या प्रमाणात थेट निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या.
पाथरी तालुक्यातील ४२ ग्रा.पं. पैकी ४ बिनविरोध झाल्याने ३८ ग्रा. पं.च्या निवडणुका घेण्यात आल्या. पाथरी तालुक्यात मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. आ. बाबाजाणी दुर्राणी हे कोणत्याही निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष देत असल्याने कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळाल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशीच अनेक ठिकाणी लढत झाली. काँग्रेसचा फारसा प्रभाव जाणवला नाही किंवा त्याकडे अधिक लक्ष दिले गेल्याचे दिसले नाही. आगामी काळात होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे या निवडणुकीत अधिक प्रभावीपणे प्रतिष्ठा जपली गेली आहे. तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काही ठिकाणी महाआघाडी सोबत दिसून आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक सरशी झाली आहे. गावगाड्यातील पुढाऱ्यांनी निवडणुकीत बाहेरचे मतदार आणण्यापासून ते सर्वच बाबतीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा केल्याचे पाहावयास मिळाले.