लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे, आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:42+5:302021-07-03T04:12:42+5:30
कोरोनापूर्वी ऑफलाइन पद्धतीने आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स मोठ्या प्रमाणावर काढली जात होती. यामध्ये दररोज दोनशे ते अडीचशे जणांची चाचणी ...
कोरोनापूर्वी ऑफलाइन पद्धतीने आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स मोठ्या प्रमाणावर काढली जात होती. यामध्ये दररोज दोनशे ते अडीचशे जणांची चाचणी घेऊन त्यांना लायसन्स दिले जात होते. २०२० मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनामुळे लायसन्स काढताना काही नियम बदलण्यात आले. यामध्ये कार्यालयातील होणारी गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के लायसन्स ऑनलाइन पद्धतीने दिली जात होती. असे असूनही अनेकदा उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेत काही तांत्रिक बाबींमुळे अडचण आल्यास ऑफलाइन अर्ज करून परीक्षा देण्यास अनेक जण प्राधान्य देत आहेत. यामुळे आरटीओ कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.
किती लायसन्स दिली
वर्ष लर्निंग परमनंट
२०१९-२० २४,५८७ १२,३०२
२०२०-२१ २९,६९६ १०,७७३
२०२१-२२ २,३२३ १,१२८
उमेदवार वेगळा, ऑनलाइन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाइन पद्धतीने कार्यालयात न येता अर्ज सादर करताना एका उमेदवाराचा अर्ज तर दुसऱ्याकडून परीक्षा दिली जाण्याचा प्रकार होऊ शकतो. परंतु, कार्यालयामध्ये आल्यानंतर संबंधित उमेदवाराची कागदपत्रे, फोटो, अंगठा या बाबी तपासल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जात नाही. यामुळे हा प्रकार घरी बसून अर्ज करण्याच्या बाबत होऊ शकतो. एरव्ही शक्य नाही.
कार्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेऊन उमेदवारांनी अर्ज सादर करून येथे परीक्षा द्यावी. किंवा जे संगणक साक्षर आहेत, त्यांनी ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी. अपॉइंटमेंट सर्वांना उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - श्रीकृष्ण नकाते, उप प्रदेशिक परिवहन अधिकारी, परभणी.
ऑनलाइनसाठी अडचणी काय?
आधार व मोबाइल नंबर एकमेकांना लिंक नसल्यास अर्ज सादर केल्यावर उमेदवाराला ओटीपी येत नाही. यासाठी आधार कार्डवरील नाव, फोटो, मोबाइल नंबर, स्वाक्षरी यांची माहिती अद्ययावत करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा अपॉइंटमेंट स्लॉट मिळत नसल्याने उमेदवारांचे अर्ज प्रलंबित राहतात. यासाठी शक्यतो ऑफलाइन अर्ज करावा किंवा ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत अर्ज सादर करावा.
मी अर्ज करून १५ दिवस झाले. मला सप्टेंबरमधील शिकाऊ लायसन्सची परीक्षा वेळ आणि तारीख मिळाली आहे. यामुळे माझी गैरसोय होत आहे. फी भरूनही प्रक्रियेस उशीर होत आहे.
- कृष्णा कटारे.
ऑनलाइन अर्ज सादर करताना दोन ते तीन वेळेस तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे आता ऑफलाइन अर्ज भरला आहे. माझी परीक्षा बाकी आहे. अपॉइंटमेंट मिळाली की ही परीक्षा झाल्यावर माझे लायनन्स मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- अमृता भोसले.
६० ते ७० जणांची दररोज परीक्षा
उप प्रदेशिक परिवहन कार्यालयात सध्या शिकाऊ परवाना खिडकीमध्ये दिवसभरात किमान ६० ते ७० जणांची परीक्षा घेतली जात आहे. यासाठी पुढील १० दिवसांच्या अपॉइंटमेंट देण्यात आल्या आहेत.