'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:06 PM2024-02-15T16:06:46+5:302024-02-15T16:07:36+5:30
पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.
- विठ्ठल भिसे
पाथरी: चारी क्र 49 मधून पाणी सोडण्याची मागणी करत तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज दुपारी वरखेड येथील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असल्याने शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना दोन पाणी आवर्तन मंजूर करण्यात आले आहेत. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले होते. तर दुसरे आवर्तन आठ दिवसापासून सोडण्यात आले आहे. असे असले तरी हदगाव बु येथील चारी क्रमांक 49 ला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. या चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. कालवा निरीक्षक यांनी पाणी सोडतो पाणीपट्टी भरून घ्या , म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली. मात्र, जायकवाडीचे पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. यातच खताचा डोस दिल्याने पिके करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
यामुळे आज सकाळी आठ वाजेपासून वरखेड जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालया शेजारील डाव्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत चारी क्रमांक 49 ला पाणी सोडले जात नाही तोपर्यंत बाहेर येणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. दरम्यान, उप विभागीय अभियंता पवार घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.
पूर्णक्षमतेने पाणी सोडावे
पैठणच्या जायकवाडी धरणा मधून रब्बी हंगामासाठी पाण्याचे दुसरे आणि शेवटचे आवर्तन सोडले गेलेले असून बी 59 वितरेकेला पूर्ण क्षमतेने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे .रब्बीतील उशिरा पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची आवश्यक असताना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टेल पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही .त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी बी 59 चारीमध्ये सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.