पतीला सोडून पत्नीचा प्रियकराशी घरोबा, संशयात अडकले नवरोबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:48+5:302021-09-10T04:24:48+5:30
सोशल मीडियाचे भूत आजकाल प्रत्येकाच्या डोक्यात गेले आहे. ह्यात त्याचा वापर चुकीचा केल्यास संसारसुद्धा मोडू शकतो, हे ह्या घटनेतून ...
सोशल मीडियाचे भूत आजकाल प्रत्येकाच्या डोक्यात गेले आहे. ह्यात त्याचा वापर चुकीचा केल्यास संसारसुद्धा मोडू शकतो, हे ह्या घटनेतून दिसून येते. परभणी येथील उच्चशिक्षित नवनाथ (२८) याचे प्रिती (२०) (नावे बदललेली) यांचा विवाह होऊन एक वर्ष संसार झाला. प्रिती या काळात घरात नांदली. मात्र, बाकी असलेले शिक्षण पती करू देत नसल्याची कुरबुर तिने माहेरी सांगितली. इच्छा असून शिकता येत नाही, असे तिने सगळ्यांच्या डोक्यात भरवले. याच काळात मोबाइलमध्ये सोशल मीडियावरील अॅप वापरून प्रितीचे योगेश (२५, रा.रत्नागिरी) याच्याशी सूत जुळले. मग मनमोकळे संवाद झाले. त्यातून प्रितीने घरातून पळून जाण्याचा बेत आखला. प्रितीने घरातील सोने, पैसे घेऊन पळ काढला. प्रियकर योगेश प्रितीसाठी ५०० किलोमीटरचे अंतर कापून परभणीजवळ आला. योगेशसोबत प्रिती पळून गेली आणि इकडे पती नवनाथ याच्यावर प्रिती सापडत नसल्याने तिच्या कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. प्रिती सापडेपर्यंत संशयाची सुई नवनाथ याच्यावर होती. अखेर पोलिसांनी खरे प्रकरण शोधले. अन् त्यात प्रितीच पळून गेल्याचे सत्य समोर आले.
असा लागला प्रकरणाचा छडा
डिसेंबर २०२० मध्ये शहरातील एका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. कालांतराने स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाले. त्यानुसार सायबरच्या मदतीने पोलिसांनी प्रितीचा वापरात असलेल्या मोबाईल व अन्य सीडीआर काढले. मात्र, तेथे काहीच आढळून आले नाही. अखेर तपासाची दिशा बदलून वेगवेगळ्या ॲपचा वापर प्रितीने फोनद्वारे केल्याचे समजले. एका ॲपमधून अशाच प्रकारे प्रितीने योगेशशी मैत्री करून त्यांचे प्रेम जुळल्याचे समजले. पोलीस नाईक संतोष व्यवहारे यांनी सर्व माहिती गोळा करून प्रिती आणि योगेशचे लोकेशन सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांना सांगितले. त्यानुसार गौस पठाण यांनी आरोपीचा सीडीआर घेऊन त्याची चौकशी केली. यात तो रत्नागिरी भागात राहत असल्याचे समजले. त्यानुसार पथक त्याच्या सांगण्यावरून प्रितीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत पोहोचले. तेथे प्रिती आढळली. यानंतर तिला परभणी येथे आणण्यात आले. प्रितीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात पोलिसांनी दिले.
योगेशचे पहिले तर प्रितीचे दुसरे लग्न
प्रिती परभणीतून पळाली. यानंतर तिने योगेशसोबत काही दिवस घालवले. या कालावधीत तिने योगेशसोबत लग्न केले. पहिले लग्न झालेले असतानासुद्धा तिने दुसरे लग्न केले तर योगेशने शासकीय नोंदणीकृत लग्न पार पाडले. मात्र यानंतर योगेश व प्रिती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हे सत्य समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, रंजीत आगळे यांनी प्रितीला परभणीत आणले.
प्रितीने सोडला नाही पुरावा
एकीकडे प्रितीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यात पती नवनाथ याचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरून नवनाथ यानेच प्रितीचे अपहरण केले असावे, असा संशय कुटुंबाने व्यक्त केला. पोलिसांनी त्यावरून एक-दीड महिना वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. यात प्रितीने कोणताही पुरावा मागे न सोडता नवनाथ हा मानसिक त्रास देत असल्याचे कारण पुढे करून घरातून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला. सोशल मीडियावरील आकर्षणातून पोलिसांना गुमराह करण्याचा प्रकार समोर आल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.