परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न विधानसभेत मांडणार; राहुल पाटील यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:39 PM2018-06-29T13:39:56+5:302018-06-29T13:42:12+5:30
पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.
परभणी : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.
रिलायन्स पीक विमा कंपनी, जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकारी आणि जिल्हाधिधकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकांचे नुकसान झाले असतानाही विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. जिल्हाभरातील या शेतकऱ्यांनी २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, आ. डॉ. राहुल पाटील यांनी शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. पीक विम्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले.
पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र पीक विम्याच्या गंभीर प्रश्नावर शेकडो शेतकरी पेरण्यांची कामे सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत, हे विशेष.