लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 23, 2024 02:04 PM2024-04-23T14:04:00+5:302024-04-23T14:15:02+5:30
या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे.
परभणी : अवघ्या दोन दिवसांवर लोकसभेच्या प्रचारास पूर्णविराम लागणार असल्याने महाविकास आघाडी, महायुती यांच्यासह इतर पक्ष, अपक्ष उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी आपल्या उमेदवारांच्या मताधिक्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र या लोकसभेच्या रणसंग्रामात नकळत विधानसभा निवडणुकीची बीजे रोवली जात आहे. लोकसभेचा हा रणसंग्राम असला तरीही, यातून विधानसभेच्या राजकीय गणितांची घडी बसविण्यात येत आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांसह इच्छुक नेते मंडळी त्यादृष्टीने कामाला लागल्याची परिस्थिती दिसून येत आहेत.
लोकसभा निवडणूक देशाचे हवा बदलणारी असते. यात मिळालेल्या बहुमताच्या बळावर अनेक राज्यांची राजकीय गणिते मांडली जातात. या रणसंग्रामानंतर साधारण सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, महाविकास आघाडी, महायुतीचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहून पुढील गणिते मांडत आहे. यासह वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्ष आणि अपक्षसुद्धा आपापल्या पातळीवर विजयाची आकडेमोड करताय. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला मतदान होत असून, प्रशासकीय स्तरावर जवळपास तयारी झाली आहे. राजकीय स्तरावर प्रचार तोफा दोन दिवसांनंतर थंड होणार असून, यानंतर खरी रणनीती सुरू होईल.
शक्तिप्रदर्शनातून मांडली जाणार गणिते
लोकसभेच्या रणसंग्रामात गत ३५ वर्षांत येथील मतदारांनी सेनेच्या उमेदवाराला पसंती दिल्याने राज्यभरात परभणीचा डंका वाजतो. मात्र या निवडणुकीत राजकीय परिस्थिती वेगळी असून महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीत जोरदार लढत आहे. या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालावर विधानसभेतील मतदारांचा कौल नेत्यांपुढे येईल. त्यामुळे सहा विधानसभा क्षेत्रनिहाय आजी माजी आमदारांसह इच्छुक नेते, पदाधिकारी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा, त्याला आपल्या मतदारसंघातून आघाडी देण्याच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शनासह रणनीती आखली जात आहे.
सहा विधानसभा १३०० गावे
परभणी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आजी - माजी आमदार, पदाधिकारी आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहे. यात निवडणुकीच्या माध्यमातून अनेक जण विधानसभेची गणिते मांडत त्याअनुषंगाने प्रचाराला लागला आहे. लोकसभा मतदारसंघातील १३०० गावांत महायुती, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जात आहे.