परभणीतील देवठाणा परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:14 PM2018-03-07T18:14:40+5:302018-03-07T18:16:56+5:30
देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले.
पूर्णा(परभणी) : देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांपासून पूर्णा तालुक्यातील देवठाणा, देऊळगाव, लिमला या परिसरात शेतातील पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. सोमवारी देवठाणा येथे गायीच्या करवडीवर असाच हल्ला झाला होता. यावेळी परिसरातील ठसे पाहून हा बिबट्या असू शकतो असा अंदाज वनविभागाने लावला होता. यानंतर काल रात्री ८ वाजेच्या दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी डी के डाखोरे, व्ही एन सातपुते आदी अधिकाऱ्यांचा ताफा व गावकरी यांनी या परिसरात शोध मोहीम राबवली. शिकारीचे अमिश दाखवून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
२० फुटावर होता बिबट्या
या परिसरात मंगळवारपासून ठिकठिकाणी सापळे लावून बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. काल रात्री झालेल्या या शोध मोहिमेत अचानक वन विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर बिबट्यावर पडली. अवघ्या 20 फुटाच्या अंतरावर असलेल्या बिबट्या अधिकारी व गावकऱ्यांना पाहून तेथून पसार झाला. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने देवठाणा ,देऊळगाव, लिमला परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.