जिंतूरमधील कृषी केंद्राचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:42+5:302021-06-16T04:24:42+5:30
जिंतूर शहरातील बालाजी फर्टिलायझर्स या दुकानदाराने मूळ किमतीपेक्षा जास्त दराने सोयाबीन बियाणे विक्री केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने तालुका कृषी ...
जिंतूर शहरातील बालाजी फर्टिलायझर्स या दुकानदाराने मूळ किमतीपेक्षा जास्त दराने सोयाबीन बियाणे विक्री केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे १४ जून रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच गुणनियंत्रण निरीक्षकांनी तपासणी केली. त्यावेळी मे. बालाजी फर्टिलायझर्स या दुकानाच्या मालकाने सदर शेतकऱ्याला अतिरिक्त रकमेचे स्ट्रॉंग आर्म नावाचे तणनाशक दिले असल्याचे सांगितले. त्या ठिकाणाहून शेतकऱ्याची विचारणा केली, तेव्हा असे तणनाशक मिळाले नसल्याचे शेतकऱ्याने स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित दुकानदाराने या शेतकऱ्यास तणनाशक देऊ किंवा पैसे परत घेऊन जा, असे सांगितले. यावरून जादा दराने बियाणे विक्री केल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच उगम प्रमाणपत्र परवण्यात समाविष्ट नसताना बियाणी विक्री करणे, सत्यतादर्शक बियाणांच्या स्त्रोताची माहिती न देणे, भावफलक अद्ययावत न करणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना अहवाल सादर न करणे आदी त्रुटीदेखील आढळल्या. या सर्व कारणावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मे. बालाजी फर्टिलायझर्स, मोंढा रोड, जिंतूर या दुकानाचा बियाणे विक्री करण्याचा परवाना १५ जूनपासून ते १२ सप्टेंबरपर्यंत ९० दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केला आहे. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत बियाणे विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.