अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणाऱ्या महिलेस आजन्म कारावास
By राजन मगरुळकर | Published: April 28, 2023 06:26 PM2023-04-28T18:26:16+5:302023-04-28T18:26:34+5:30
परभणी जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा; सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात आरोपीने वरील गुन्हा केल्याचे सिद्ध झाले.
परभणी : आरोपी महिलेने तीन साक्षीदारांसह फिर्यादीस कट रचून डांबून ठेवून खंडणी वसूल केली म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी महिलेस परभणी जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-३ एस.पी.पिंगळे यांनी शुक्रवारी दिला आहे.
याबाबतची माहिती अशी, सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीतील अभियंता अंगद नवटक्के यांनी २२ ऑक्टोबर २००९ मध्ये फिर्याद दिली होती. आरोपी नूरजहा ही फिर्यादी नवटक्के यांच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष येऊन व फोनद्वारे संपर्क करून आरोपीच्या नवऱ्याचे प्रलंबित देयक काढा, असा तगादा लावू लागली. फिर्यादी यांच्याकडे कोणतेही काम प्रलंबित नव्हते. आरोपी ही नेहमी फोन करत असल्याने फिर्यादी याने आरोपी नूरजहा हिला सतत फोन करून त्रास दिला तर पोलीस कारवाई करेल, असे सांगितले होते.
त्यानंतर एक ऑक्टोबर २००९ ला सायंकाळी फिर्यादी नवटक्के व त्यांचा मित्र मो.अब्दुल मुजीब हे शासकीय वाहनाने छत्रपती संभाजी नगरकडे जाण्यासाठी निघाले असता जालना टोल नाक्यावर एक कार त्यांच्या वाहनासमोर आडवी करून थांबली. त्या वाहनातून दोन ते तीन इसम खाली उतरले. त्यांनी फिर्यादी वाहनात असल्याची खात्री केली. यासह चालकास वाहनाच्या खाली उतरविले. सर्वांच्या खिशातील मोबाईल काढून घेत त्यातील एकाने सदरील वाहन स्वतः चालवून जालनाच्या पुढे एका शेतात थांबविले. यामध्ये फिर्यादी अंगद नवटक्के व त्यांच्या मित्रास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील कपडे तपासून पैशाची मागणी केली.
फिर्यादीचा मित्र शेख मुजीब यास फोन देऊन नातेवाईक यांच्याकडून पैशाची मागणी करण्यास सांगितले. त्याचे नातेवाईक अजीमोद्दीन यांनी दीड लाख रुपये आणून दिल्यानंतर त्यांची सुटका केली व त्यानंतर आरोपी हे फिर्यादीस फोनद्वारे उर्वरित रकमेची मागणी करू लागले. या त्रासाला कंटाळून फिर्यादी नवटके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केला. त्यावरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासात महिला आरोपी व तिचे तीन साथीदार यांनी कट रचून फिर्यादीस खंडणीसाठी डांबून ठेवून खंडणी वसूल केल्याचे निष्पन्न झाले.
आठ साक्षीदार तपासले
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मंगल चव्हाण यांनी केला. सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात आरोपीने वरील गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. जिल्हा न्यायाधीश-३ एस.पी.पिंगळे यांनी सर्व साक्षी पुराव्याचे अवलोकन करून २८ एप्रिलला आरोपी नूरजहा उर्फ आयशा.बी.इकबाल पठाण (रा.जालना) यास कलम ३६४ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी तसेच कलम ३८७ नुसार सात वर्षे व पाच हजार दंड. दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.
यांनी पाहिले काम
मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार दत्तराव खुने, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.