अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अजीवन कारवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:42 PM2019-03-20T18:42:37+5:302019-03-20T18:43:17+5:30
सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल होता
परभणी : आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद बबलू सय्यद अशरफ (रा.कानडखेड,ता.पूर्णा) यास अजीवन कारावासाची शिक्षा परभणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी सुनावली आहे. २० मार्च रोजी हा निकाल देण्यात आला.
सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार १८ एप्रिल २०१८ रोजी पीडीत मुलीचे आई-वडिल गांधी पार्क परिसरातील सागर एम्पोरियम या दुकानात खरेदी करीत होते. त्यावेळी पीडित मुलगी ही आरोपी सय्यद बबलू सय्यद आशफाक याच्यासोबत होती. तेथूनच आरोपीने ८ वर्षांच्या पीडित मुलीस पळवून नेले. पूर्णा तालुक्यातील अजदापूर येथील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रणिता बाभळे यांनी घटनेचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी- फलके यांनी आरोपी सय्यद बबलू यास दोषी ठरवत अजीवन कारवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३६३ अन्वये ३ वर्षे कारवास व १० हजार रुपये दंड, कलम ३६६-अ नुसार ३ वर्षे कारवास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा
पोस्कोच्या सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पीडित मुलगी ही ८ वर्षांची होती व या प्रकरणात वैद्यकीय पुरावा, डी.एन.ए. अहवाल, सी.सी.टी.व्ही. फुटेज व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे डी.एन.ए. व वैद्यकीय पुरावा हा एकमेकांशी सुसंगत असून, त्यास न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीला शिक्षा ठोठावली.