तिकडे बजेटमध्ये कोटींच्या घोषणा, इकडे साधा पूल होईना; विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:42 PM2024-07-23T12:42:58+5:302024-07-23T12:48:55+5:30

फुलवाडीतील विद्यार्थी जीव धोक्यात घालून गिरवत आहेत आयुष्याचे धडे

Life-threatening exercise of students while making a road through stream water to go to school | तिकडे बजेटमध्ये कोटींच्या घोषणा, इकडे साधा पूल होईना; विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

तिकडे बजेटमध्ये कोटींच्या घोषणा, इकडे साधा पूल होईना; विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

जिंतूर : तालुक्यातील फुलवाडी येथे ओढ्यावरील पुलाचे काम न झाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणच नव्हे तर आयुष्याचे धडे गिरवत आहेत. याचे प्रशासनाला, राजकीय मंडळींना गांभीर्य नसल्याने ग्रामस्थांना दर पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यास अशीच जीवघेणी कसरत करावी लागते.

आडगाव- इटोली रस्त्यावर जवळपास ५०० लोकसंख्या असलेले फुलवाडी हे छोटेसे गाव. मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ ५०० - ७०० फुटाचे अंतर आहे. तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून सात लाख रुपये खर्चून पुन्हा रस्ता झाला. मात्र, गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. गावातून पहिली ते बारावी पर्यंत चे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी बाहेर गावाच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात. काही विद्यार्थी आश्रम शाळेत काही विद्यार्थी गडदगव्हाण तर काही विद्यार्थी आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज जाणेयेणे करतात. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. 

मोठा पाऊस येऊन ओढ्याला पाणी आले तर विद्यार्थ्यांना कधी गडदगव्हाण तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो. शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकांनाही पाण्यामुळे गावात येत नाही. पाणी कमी झाल्यानंतर पालकाच्या मदतीने ओढा ओलांडून विद्यार्थी शाळेत जातात. ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून या भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पुल मंजूर करावा अशी मागणी होत आहे. पुलासाठी मोठा खर्च आहे पण येथे मतदार संख्या कमी असल्याने कोणतेच राजकीय नेतृत्व पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. आज देशाचे बजेट सादर करताना करोडोंच्या योजनांच्या घोषणा झाल्या, मात्र इकडे वर्षानुवर्ष मागणी करूनही ओढ्यावर साधा पूल होत नाही, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. 

आता तर बस ही बंद
आडगाव इटोली मार्गावर नेहमी धावणाऱ्या बस व शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मानव विकासच्या बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. आडगाव -इटोली रस्त्यावर काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गिट्टी अंथरूण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील बस बंद असल्याचे दिसत आहे. यामुळे  शाळकरी मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे

हे चित्र केव्हा बदलणार
जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे या रस्त्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद विभागाचे कोणतेही लक्ष नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

अनेक वर्षांपासून जीवघेणा प्रवास
फुलवाडी येथील पुलाच्या कामाच्या संदर्भात अनेक वेळा प्रशासकीय, राजकीय पातळीवर पाठपुरावा केला. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत आहेत. 
- श्रीरंग राठोड, ग्रामस्थ, गडद गव्हाण

Web Title: Life-threatening exercise of students while making a road through stream water to go to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.