रूग्णवाहिका चालकांचा जिवघेणा प्रवास स्थिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:18+5:302021-06-22T04:13:18+5:30
सेलूतील कोरोना प्रादुर्भावात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णवाहिका चालक सचिन सावंगीकर, बाळू काजळे, अनिल ...
सेलूतील कोरोना प्रादुर्भावात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णवाहिका चालक सचिन सावंगीकर, बाळू काजळे, अनिल डोईफोडे, दिपक गिरी, गणेश गात, ज्ञानेश्वर आवटे, श्रीनिवास सोळंके व शासकीय चालक चंद्रकांत बोराडे यांनी काम केले. जवळपास ६०० कोरोना बाधितांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून या चालकांनी सेवाधर्म बजावला. हे काम करताना खासगी रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून माफक किराया घेतला. यासोबतच इतर रुग्णांनाही सेवा दिली. या काळात सचिन सावंगीकर व बाळू काजळे यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी १३ दिवस उपचार घेऊन लगेच आपले कर्तव्य बजावले होते. कोरोना बाधीतांसोबतचा जिवघेणा प्रवास या चालकांनी सेवाभाव म्हणून पुर्ण केला. आता संख्या घटु लागल्याने त्यांचा हा दगदगीचा प्रवास काही अंशी स्थिर झाल्याचे दिसते.
कोरोना बाधितांना नेताना स्वतः चा बचाव करण्यासाठी मास्क व सँनिटायझर सातत्याने वापरले. रुग्णांची बेडवर व्यवस्था होईपर्यंत आम्ही सेवा बजावली. आमच्यापासुन कुटूंबातील व्यक्तींना बाधा होऊ नये यासाठी काळजी घेतली. रस्त्यावर आम्हाला कोणताही हाँटेल चालक चहा, नाष्टा व पाणी सुध्दा देत नव्हते. परतीच्या प्रवासात कधी कधी उपाशीपोटी घरी परतावे लागत होते. पण हे कर्तव्य सामाजिक बांधीलकीतून पुर्ण केले. - सचिन सावंगीकर, रुग्णवाहिका चालक, सेलू.