ध्यानकेंद्राच्या बांधकामावर वीज कोसळली; एका कामगाराचा जागीच मृत्यू, ६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 18:52 IST2024-10-15T18:51:51+5:302024-10-15T18:52:15+5:30
जिंतूर तालुक्यातही पाचलेगाव येथील घटना; दोघांची प्रकृती आहे चिंताजनक

ध्यानकेंद्राच्या बांधकामावर वीज कोसळली; एका कामगाराचा जागीच मृत्यू, ६ जखमी
जिंतूर : तालुक्यातील पाचलेगाव येथे ध्यान केंद्राचे बांधकाम चालू असलेली ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज कोसळून येथील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाले आहेत. गंभीर प्रकृती असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आले आहे. तर यातील चार जणांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
जिंतूर तालुक्यात पाचलेगावात ध्यान केंद्राचे काम सुरू आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वातावरण बदलून पाऊस सुरू झाला. यावेळी अचानक अंगावर वीज कोसळून ३५ वर्षीय इस्राईल शेख गणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा कामगार होरपळून जखमी झाले. जखमी पैकी साजीद खान मनजीत खान, शेख जावेद शेख गणी हे दोघे गंभीर असल्याने त्यांना तात्काळ परभणीला अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. अस्लम खान ताहेर खान,शेषबाज अब्जल पठाण,वाजीद खान पठाण,शेख मुख्तार शेख मोहमद या ४ जणांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महसूल विभागाने केला पंचनामा
तहसीलदार राजेश सरोदे यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी मोहसीन पठाण तलाठी सुनील झिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.