अतिवृष्टी अनुदानाच्या सहा गावांच्या याद्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:34+5:302021-01-03T04:18:34+5:30
सेलू : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतक-यांना अनुदान वाटप केले जात असले तरी तालुक्यातील सहा गावांच्या याद्या ...
सेलू : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतक-यांना अनुदान वाटप केले जात असले तरी तालुक्यातील सहा गावांच्या याद्या अद्यापही बॅंकेकडे देण्यात आल्या नसल्याने ३ हजार ८६७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने २ हेक्टरची मर्यादा घालून हेक्टरी १० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. तालुक्यातील ९४ पैकी ७३ गावातील शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले होते; मात्र पहिल्या टप्प्यात १८ कोटी ७२ लाख रुपये प्राप्त झाले होते. त्यात ५२ गावातील शेतक-यांनाच उपलब्ध अनुदान देणे शक्य झाले आहे. ४६ गावातील शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे. मात्र सेलू शहरातील ९२१ शेतक-यांचे २६ लाख ४३ हजार ९३६, वाकी गावातील २३४ शेतक-यांचे ५ लाख ३२ हजार २८८, आहेर बोरगाव येथील ८५० शेतक-यांचे ६७ लाख ५५ हजार, कुपटा येथील ८८२ शेतक-यांचे ६६ लाख ६९ हजार ७०० रुपये, गोहेगावातील ४१५ शेतक-यांचे २५ लाख ६७ हजार ७०० रुपये, धनेगाव येथील ५६६ शेतक-यांचे ३९ लाख ९४ हजार ८०० रुपये अनुदान आहे. संबंधित तलाठी यांनी याद्या दिल्यानंतर पडताळणीचे काम पूर्ण होत नसल्याने अद्यापही संबंधित शेतक-यांच्या खात्यातवर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
संबंधित गावाच्या याद्या पडताळणीसाठी दिलेल्या आहेत. चुकीचे नावे येऊ नयेत म्हणून पडताळणी केली जात आहे. लवकरच पडताळणी करून सहा गावांच्या याद्या बॅंकेकडे दिल्या जातील.
-बालाजी शेवाळे, तहसीलदार, सेलू