३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:36+5:302020-12-17T04:42:36+5:30

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही ...

Load of 34 thousand electricity consumers on 9 substations | ३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

Next

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही १३२ केव्हीचे केंद्र नसल्याने वीज समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना दिवसा तर सोडाच अर्ध्या रात्रीही कृषीपंप सुरू करावा लागतो. त्यामुळे बळीराजासह वीज ग्राहक महावितरणच्या कारभाराविरुद्ध संतप्त झाले आहेत.

छोट्या-मोठ्या उद्योगांसह घराघरांत विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. या अनुषंगाने सेलू तालुक्यात सद्यस्थितीत २३ हजार घरगुती, ४०० औद्योगिक तर १० हजार ५३० कृषीपंपधारकांनी वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेतला आहे. या ग्राहकांना वेळेत व सुरळीत वीजपुरवठा करण्याचे काम महावितरण कंपनीचे आहे. मात्र, शहरासह तालुक्यात तोकड्या वीज सुविधांअभावी वीज ग्राहकांना भारनियमनासह तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत शहरासह तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी नऊ ३३ केव्ही उपकेंद्र अस्तित्वात आहेत. यामध्ये ७ ग्रामीण भागात तर दाेन उपकेंद्र सेलू शहरात आहेत. या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या ३३ उपकेंद्रांना जिंतूर, पाथरी व जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील १३२ केव्ही केंद्रांमधून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री अनेक अडचणींचा सामना वीज ग्राहकांसह कृषीपंपधारक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कृषीपंप व वीज ग्राहकांची संख्या वाढत असल्याने मागणीच्या तुलनेत वीज कमी पडत आहे. त्यामुळे कृषी विद्युत वाहिनीसाठी १६ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यासाठी ठरलेल्या वेळेनुसार सलग सात दिवस सकाळी ९.२० ते दुपारी ५.२० असे आठ तास व त्यानंतरचे सलग सात दिवस रात्री ११.२० ते सकाळी ९.२० असे १० तास वीजपुरवठा केला जातो. त्यातही तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे १३२ केव्ही केंद्रासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून न राहता सेलू तालुक्यात हे केंद्र उभारावेत, अशी मागणी सेलूकरांमधून होत आहे.

१५ दिवस रात्रीच द्यावे लागते पाणी

वीज वितरण कंपनीच्या वतीने महिन्यात जवळपास शेतकऱ्यांना १५ दिवस रात्री ११ वाजता शेतात जावून कृषीपंप सुरु करावा लागतो. रात्री जनावरांची भीती असतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना हा धोका पत्करून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.

भारिनयमनाचे वेळापत्रक हे शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयातून ठरविले जाते. परंतु, कृषी वाहिनीवर दिवसभरात भारनियमन करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असली तरी वरिष्ठांचे निर्देश टाळू शकत नाहीत. ज्या गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची दहा एकर जमीन आहे आणि त्या ग्रामस्थांची मागणी असेल तर त्या ठिकाणी दोन मेगावॅटचा सौर प्लँट कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठा करता येईल., असे शासनाचे निर्देश आहेत.

एस.एम. आरगडे, उपकार्यकारी अभियंता.

Web Title: Load of 34 thousand electricity consumers on 9 substations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.