Lockdown : आज मध्यरात्रीपासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत परभणीत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 03:30 PM2020-08-09T15:30:37+5:302020-08-09T15:32:55+5:30
परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत व लगतच्या ५ कि.मी. परिसरात संचारबंदी
परभणी : कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा एकदा संचारबंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, रविवारी काढलेल्या आदेशामुळे आता सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजे १४ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत परभणी शहरातील व्यवहार ठप्प राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. मागच्या दोन दिवसांपासून शहरात ५० च्या पटीने रुग्ण आढळत आहेत. शहरातील जवळपास सर्वच वसाहतींमध्ये आता कोरोना रुग्ण झाले आहेत. शिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढत असल्याने हा संसर्ग अधिक वेगाने फैलावत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत व लगतच्या ५ कि.मी. परिसरात ९ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते १४ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची शासकीय सुटी आहे. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी रविवार आहे. शिवाय जिल्हाधिका-यांच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार प्रत्येक शनिवार आणि रविवार संचारबंदी लागू राहील. त्यामुळे आठ दिवसानंतर म्हणजे १७ आॅगस्टपासूनच परभणी शहरातील बाजारपेठ आणि इतर व्यवहार सुरू राहणार आहेत. आठ दिवसांच्या संचारबंदीमुळे पुन्हा एकदा परभणी शहरातील बाजारपेठ ठप्प राहणार आहे.