लॉकडाऊनने वाढला मुलांचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:35+5:302021-04-28T04:18:35+5:30
परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, ...
परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पालकांनी मुलांमध्ये काही वेळ घालविला तर निश्चितच त्यांचा ताण कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता पालकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्या. मध्यंतरी डिसेंबर आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला ; परंतु तो अल्पकाळासाठी ठरला. आता पुन्हा शाळा बंद आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून मुले घरात कोंडली गेली आहेत. मुक्तपणे मैदानांवर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल आणि टीव्ही व्यतिरिक्त मनोरंजनाचे साधन शिल्लक नाही. घराच्या बाहेर आणि फार तर फार कंपाउंड वॉलच्या बाहेर मुलांना पडता येत नाही. त्यामुळे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. एकाच ठिकाणी बसून मुले बोअर होत असून आपले मित्र, सवंगडी भेटत नसल्याने ही समस्या आणखीच वाढली आहे. क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळांना मुरड घातली गेली आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचा चिडचिडेपणा, तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत घरात छोटे छोटे खेळ खेळावेत . मुलांचा चिडचिडेपणा झाला तरी त्यांना समजून घ्यावे, त्यांच्याशी एकरूप होऊन वागल्याचे निश्चितच मुलांचे आरोग्यही सुदृढ होऊ शकते.
मोबाईल, टीव्हीने वाढला एकलकोंडेपणा
मैदानी खेळ नसल्याने बहुतांश मुले आता मोबाईल आणि टीव्हीशी एकरूप झाले आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल सोबत असल्याने मुलांमध्ये एकलकोंडेपणाही वाढला आहे. ही मुले इतरांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.
तज्ज्ञांनी काय सल्ला दिला
शाळा बंद असल्याने मुलांच्या मनावर निश्चितच परिणाम झाला आहे. त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांसमवेत घालवावा. त्यांच्यासोबत खेळावे, एक चांगले वातावरण मुलांसमवेत तयार केल्यास मुलांचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होईल.
डॉ. श्याम जेथलिया, बालरोगतज्ज्ञ
मुलांवर नक्कीच ताण वाढला आहे. त्यांचा चिडचिडेपणा देखील वाढला आहे. त्यासाठी पालकांनी वेळेची विभाजन करून मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे. हे करीत असताना स्वतः देखील त्या प्रमाणेच वागावे. ठराविक वेळेतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी तसेच अभ्यास, खेळणे, जेवण यासाठीच्या वेळेचे योग्य नियोजन करून त्याचे स्वतः पालन केल्यास मुले देखील पालन करतील. तसेच मुलांसमवेत दररोज कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटीज पालकांनी करावी. तरच मुलांमध्ये दडलेल्या भावना ते पालकांसमोर व्यक्त करतील आणि त्यांचा ताण कमी होईल.
डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ