Lok Sabha Election 2019 : बोर्डीकर यांचा लोकसभा लढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 04:47 PM2019-03-20T16:47:34+5:302019-03-20T16:50:08+5:30
खोतकर यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोर्डीकर आणि जाधव यांना मुंबईला बोलावले
परभणी- परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उतरायचे की नाही या संदर्भातील मेघना बोर्डीकर यांचा निर्णय शुक्रवारी होणार असून, त्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावले आहे़
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी परभणीत माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली़ यावेळी त्यांच्यासमवेत खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, भाजपाचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी माजी आ़ बोर्डीकर व मेघना बोर्डीकर यांच्याशी राज्यमंत्री खोतकर यांनी चर्चा केली़ यावेळी मेघना बोर्डीकर यांनी मतदार संघात गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आलेल्या कामकाजाचा त्यांच्यासमोर आढावा मांडलात्यानंतर खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २२ मार्च रोजी बोर्डीकर यांना मुंबईला चर्चेसाठी बोलावले आहे.
यावेळी खा़ बंडू जाधव यांचीही उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे बोर्डीकर यांच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय २२ मार्च रोजीच मुंबईत जाहीर होणार आहे़ या संदर्भात बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, शुक्रवारी मुख्यमंत्री फडवणीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत याबाबत चर्चा होणार आहे़ त्यावेळी आपण मतदार संघात केलेल्या कामांची माहिती देणार आहोत़ मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील़ यावेळी बोलताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, मी पॉझिटीव्ह चर्चा करण्यासाठी परभणीत आलो आहे़ चर्चा पॉझिटीव्ह आहे़ त्यामुळे या संदर्भात जो काही निर्णय आहे तो २२ मार्च रोजी मुंबईत होणार आहे.
मेघना बोर्डीकर यांच्या निवडणूक लढविण्यावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर काय म्हणाले, पहा... :