Lok Sabha Election 2019 : परभणीत घटक पक्षांच्या अबोल्याने युती, आघाडीचे नेते अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:52 PM2019-03-23T12:52:17+5:302019-03-23T12:55:00+5:30
सरळ लढतीचे चित्र सध्या दिसत असताना घटक पक्षांच्या अबोल्याने दोन्हीकडील नेते मंडळी अस्वस्थ झाली आहेत.
- अभिमन्यू कांबळे
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्याने सरळ लढतीचे चित्र सध्या दिसत असताना घटक पक्षांच्या अबोल्याने दोन्हीकडील नेते मंडळी अस्वस्थ झाली आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेश विटेकर तर शिवसेनेकडून विद्यमान खा. बंडू जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे परभणीत सरळ लढतीचेच चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे आघाडी व युतीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार चालवला असताना काही घटक पक्ष प्रचारात हिरीरीने सहभागी होत नसल्याने दोन्हीकडील नेते मंडळी अस्वस्थ झाली आहे. शिवसेना-भाजपाची राज्यस्तरावर युती असताना भाजपाचे प्रमुख नेते अद्याप खा.जाधव यांच्या सोबत प्रचाराला उतरलेले नाहीत.
परवा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या परभणीत दौऱ्यात काही नेते, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी उपस्थित असले तरी त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश नव्हता. शिवाय राज्यात युती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रीय समाजपक्ष आणि रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारीही शिवसेनेच्या प्रचारात अद्याप तरी कोठेही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
दुसरीकडे आघाडीतही अलबेल नाही. राज्यभर मोठा गवगवा करुन स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली असली तरी परभणीत अशी आघाडी दिसून येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रचारसभांतील पोस्टर्सवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातत्याने नाव येत असल्याने अस्वस्थ झालेले संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी प्रसिद्धीपत्र काढून स्वाभिमानी शेतकरी संघटना अद्याप कोणत्याही आघाडीत सहभागी झालेली नाही. त्यामुळे आम्हाला गृहित धरु नये. खा. राजू शेट्टी यांनी आदेश दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीसाठी खंबीर उमेदवार उभा करेल, असेही या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात जिल्हाध्यक्ष ढगे यांनी म्हटले आहे. यावर आघाडीतील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नसली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तोंडावरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आघाडीचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. याशिवाय आघाडीतील आ.जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी फारसी प्रचारात दिसत नाही. राष्ट्रवादीचेच काही दिग्गज नेते प्रचारात उतरलेले नाहीत. त्यामुळे युती प्रमाणे आघाडीतही सुंदोपसुंदी सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
वंचित आघाडीचा नवखा उमेदवार
परभणी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने परभणीचे मूळचे रहिवासी असलेले व सध्या हैदराबाद येथे स्थायी झालेले आलमगीर खान यांना उमेदवारी दिली आहे. खान हे नवखे उमेदवार आहेत. त्यांची परभणीत फारसी ओळखच नाही. परभणी हे चळवळीचे केंद्र असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या सभांना येथे मोठी गर्दी झाली असली तरी या गर्दीचे मतात कितपत रुपांतर होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मेघना बोर्डीकर यांची माघार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी मुंबईत चर्चा झाल्यानंतर भाजपाच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. बोर्डीकर या माघार घेणार असल्याचे वृत्त यापूर्वीच ‘लोकमत’ने २० मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांना अडचण होईल, अशी कृती करणार नाही, असे सांगितले होते. त्यावेळीच मेघना बोर्डीकर या निवडणूक लढविणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते.