Lok Sabha Election 2019 : परभणीत युती- आघाडीमध्ये रंगणार लढत; मात्र वंचित बहुजन आघाडीच्या मतांवर ठरणार विजयाचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 07:35 PM2019-03-30T19:35:34+5:302019-03-30T19:36:04+5:30
चार जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून चार जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. खरी लढत शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव, राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यामध्ये होणार आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २७ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ उमेदवारांचे ७ अर्ज छाननीत नामंजूर झाले. त्यानंतर चार उमेदवारांनी २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेतली. त्यामुळे आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. अपक्ष उमेदवारांना दुपारीनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक रिंगणात १७ उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व शिवसेनेचे संजय जाधव यांच्यात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान हे नवखे असल्याने ते किती मते घेतात, यावरही या निवडणुकीच्या निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची २६ मार्च रोजी परभणीत जाहीर सभा झाली. याच दिवशी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता; परंतु, ते उपस्थित राहू शकले नाहीत.