लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना

By राजन मगरुळकर | Updated: January 17, 2025 19:40 IST2025-01-17T19:40:20+5:302025-01-17T19:40:48+5:30

परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे

Long March! Justice for Somnath Suryavanshi, thousands of followers leave for Mumbai from Parbhani | लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना

लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना

परभणी : परभणीतील सुरू असलेल्या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्याने परभणी ते मुंबई लाँग मार्च शुक्रवारी सायंकाळी परभणीतून रवाना झाला. यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवक, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि अनुयायी सहभागी झाले आहेत.

परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे, वाढीव आर्थिक मदत द्यावी, पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह तपास, शासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत आंबेडकरी संघटना, पदाधिकारी यांचे परभणीत ३३ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्याचे नियोजन केले. 

लाँग मार्चला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास परभणीतून सुरुवात झाली. धरणे आंदोलन मैदानात शहर, जिल्ह्यातील महिला, युवक सकाळपासून दाखल झाले होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत झाल्यानंतर सायंकाळी लाँग मार्चला सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाँग मार्च रवाना झाला. बसस्थानक, उड्डाणपूल, जिंतूर रोड मार्गे हा लाँग मार्च टाकळीत पहिल्या दिवशी मुक्कामी राहणार आहे. हजारोंच्या संख्येने लाँग मार्चमध्ये नागरिक, अनुयायी सहभागी झाले आहेत. यावेळी  आशिष वाकोडे, रवि सोनकांबळे, सुधीर सा‌ळवे यांच्यासह हजारो पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.   

सूर्यवंशी कुटूंबाने दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत
मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मदतीचा धनादेश काही दिवसांपूर्वी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयाला सूपूर्द करण्यास भेट घेतली होती. त्यावेळी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ आणि आई यांनी ही मदत नाकारली होती. गुरुवारी परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह तहसीलदारांनी पुन्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. मात्र, जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत व न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची माहिती प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी निघालेल्या लाँग मार्चमध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ अविनाश सूर्यवंशी आणि अशोक सूर्यवंशी हे दोघे सहभागी झाले आहेत. आई आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी हे नंतर मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Long March! Justice for Somnath Suryavanshi, thousands of followers leave for Mumbai from Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.