तासवडे- किणी टोलनाक्यावर प्रवाशांची लूट- पृथ्वीराज चव्हाण
By प्रमोद सुकरे | Published: August 4, 2023 09:05 PM2023-08-04T21:05:44+5:302023-08-04T21:05:54+5:30
सातारा ते कागल महामार्गावरील रस्त्याच्या सुमार दर्जाबाबत विधानसभेत सवाल.
कराड: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सातारा ते कागल महामार्गावर तासवडे व किणी येथे बेकायदा टोल वसुली होत असल्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कागल-सातारा या महामार्गावरील रस्त्याच्या सुमार दर्जाच्या कामाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा ते कागल या महामार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असूनसुद्धा या मार्गावरील तासवडे व किणी या दोन्ही टोलनाक्यावर महामार्गाच्या देखभालीकरिता घेण्यात येणाऱ्या टोल वसुली बाबत ४० टक्के ऐवजी ७५ टक्के इतका वसूल केला जात आहे. टोल वसुली ज्यापद्धतीने केली जाते त्यापद्धतीने रस्त्याचा दर्जा नाही. त्यामुळे याबाबत शासनाने कठोर धोरण करण्याची गरज असल्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
कागल-सातारा हा राष्ट्रीय महामार्ग कराड शहरातून जातो या महामार्गावरील रस्ता अत्यंत सुमार दर्जाचा आहे .त्यामुळे अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत. रस्त्याचा दर्जा सुमार असला तरी या रस्त्याची देखभाल त्यापद्धतीने केली जात नाही. तरी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली करून लूट केली जात असल्याचे निदर्शनास येते. आता तर या मार्गावर सहा लेनचे काम सुरु झाले आहे त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक ची समस्या होत आहे. तसेच अपघाताच्या घटना सुद्धा घडत आहेत. अनेक मोठे पूल या मार्गावर बांधले जात असून त्याचे डिझाईन काही ठिकाणी चुकले असल्याचे दिसून येते. शासनाने याबाबत धोरण ठरवून उपाययोजना केल्या पाहिजेत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नाला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना म्हणाले कि, कागल-सातारा महामार्गाच्या कामाबाबत तसेच टोल वसुलीबाबत येत्या काही दिवसात मिटिंग घेऊन मार्ग काढला जाईल.