मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:45 PM2022-02-05T18:45:48+5:302022-02-05T18:46:24+5:30
आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता.
मानवत (परभणी ): रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या २२ वर्षीय ट्रॅकमनचा रेल्वेने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे १ वाजेच्या दरम्यान घडली. प्रणव एकनाथ देशमाने असे मृताचे नाव आहे.
शहरातील कोकर कॉलनी परिसरात राहणार प्रणव एकनाथ देशमाने (वय 22) हा तीन वर्षांपासून रेल्वे विभागात ट्रॅकमन म्हणून सुरु झाला. चार फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते सकाळी 6:30 दरम्यान देवलगाव ते मानवतच्या दिशेने त्याची पेट्रोलिंगची रात्रपाळीची ड्युटी होती. प्रणव यादरम्यान कर्तव्यावर होता. कर्तव्य बजावत असताना देवलगाव आवचार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ पटरीवरून जात असताना सुपरफास्ट जाणाऱ्या एका एक्सप्रेसने धडक दिली. या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, धडक कोणत्या एक्सप्रेस रेल्वे न दिली याबाबत माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विष्णू सूर्यवंशी, विष्णू चव्हाण, बळीराम थोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शवविच्छेदन करण्यात आले. मामा संतोष लक्ष्मणराव पवार यांच्या माहितीवरून मानवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास विष्णू सूर्यवंशी करत आहेत.
एकुलता एक आधार हिरावला
प्रणव देशमानेची 2019 ला रेल्वे विभागात ट्रॅकमॅन म्हणून निवड झाली होती. आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला. मात्र, या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.