परभणीत आंबेडकर जयंतीनिमित्त महावंदनेसाठी लोटली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:43 PM2018-04-14T13:43:44+5:302018-04-14T13:45:23+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला.
परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील हजारो उपासक - उपासिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले.
महावंदना सुकाणू समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षीही कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास महावंदनेला सुरुवात झाली. शुभ्र वस्त्र परिधान करुन जिल्हाभरातील हजारो उपासक- उपासिका यावेळी उपस्थित होते. प्रारंभी भदंत कश्यप थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भंते मुदितानंद, भंते पी. धम्मानंद, भंते मोगलायन, भंते रतनज्योती, भंते प्रज्ञाबोधी या भिख्खू संघाने त्रिसरण, पंचशील दिले. त्यानंतर भिमस्तुती, सरणताय प्रार्थना पार पडली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी मानवंदना दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमा दरम्यान भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर लाठी-काठीचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. या महावंदना कार्यक्रमास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींबरोबरच जिल्हाभरातील हजारो उपासक- उपासिका उपस्थित होते.
महावंदना सुकाणू समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम घेतला जात आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महावंदनेचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. जिल्हाभरात दिवसभर विविध कार्यक्रमांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.