परभणीत नीचांकी तापमानाची नोंद, पारा ७.६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 02:50 PM2021-12-22T14:50:13+5:302021-12-22T14:50:57+5:30
गत आठवडाभरापासून तापमानात घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी सोसावी लागत आहे.
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार मंगळवारी जिल्ह्यात ७.६ अंश किमान तापमान नोंद झाले आहे.
गत आठवडाभरापासून तापमानात घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी सोसावी लागत आहे. गत आठवड्यात जिल्ह्यात किमान तापमान १६ अंशांपर्यंत होते. मात्र, या तापमानात दररोज घट होत असून, मंगळवारी तापमानात ७.६ अंशापर्यंत घसरण झाली. या हंगामातील नीचांकी तापमान नोंद झाले असून, जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे.
तापमानात घट झाल्याने जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. पहाटेच्या सुमारास थंडीचा परिणाम जास्त जाणवत असून, सकाळी ९ वाजेपर्यंत व्यवहार सुरू होत नाहीत. सायंकाळी देखील रस्त्यावरील वाहतूक लवकरच विरळ होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तविली आहे.