'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस
By ज्ञानेश्वर भाले | Published: June 17, 2023 04:54 PM2023-06-17T16:54:24+5:302023-06-17T16:54:45+5:30
चारपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून २४० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत
सेलू (जि.परभणी) : शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी दुर्लक्षित झालेला वालूर नाका ते मदरसा साडेतीन किमी रस्त्याचे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. यादरम्यान येणारे अतिक्रमण काढण्यात येत असून, यादरम्यान येणाऱ्या २४० अतिक्रमणधारकांना सा. बां. उपविभागीय अभियंता यांनी नोटिसा बजावल्या आहेत. नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने शहराच्या वैभवात भर टाकणारा रस्ता ठरणार आहे.
वालूर ते मदरसामार्गे सेलू असा लोहमार्गासाठी रस्ता होता. पण रस्ता आडगळीला पडला. हा दारुल उलूम उर्दू मदरसा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असा साडेतीन कि.मी. रस्ता कामासाठी मंत्रालय स्तरावरील ३० कोटी निविदाप्रक्रियेतून २३ कोटी ७४ लाख ४३ हजार २०१ असे सर्वात कमी दर असलेली एका कंपनीस हे काम मिळाले. कार्यकारी अभियंता यांनी २४ मार्च २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिले. मदरसा ते वालूर नाका रस्त्याचे काम व चार पूल झाले आहेत. शहरातील वालूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, असे रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी २४० जणांना लक्ष्मण नामावार उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग सेलू यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील चारपदरी होणारा हा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.
असा आसणार चारपदरी रस्ता
शहरात वालूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज हा डिव्हायडरच्या दोन्ही बाजूने सहा मीटर सिमेंट रस्तालगत १.५ मीटर पेव्हर ब्लॉक फुटपाथ व १.५ मीटर नाली व कडेला वृक्षारोपण असा हा भव्य रस्ता आणि सात पूल याने सेलू शहराचे वैभव वाढविले, तर वालूर नाका ते मदरसा परभणी रस्त्यापर्यंत २० मीटरचा दोन पदरी रस्ता होत आहे, अशी माहिती सहायक अभियंता बळीराम माने यांनी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू
संबंधित एजन्सीकडील यंत्रसामग्री आणि मनुष्यबळामुळे हे काम प्रगतिपथावर आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेत सहकार्य करावे. एक वर्ष मुदत असली तरी जुलै महिन्यात रस्ता वाहतुकीस सुरू होईल, असा प्रयत्न सुरू आहेत.
- लक्ष्मण नामावार, उपविभागीय अभियंता सा. बां. उपविभाग