पाथरीत महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी अटळ; जातिपातीच्या राजकारणाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 06:59 PM2024-10-26T18:59:07+5:302024-10-26T19:00:28+5:30
पाथरी विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार
पाथरी : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढतीची अपेक्षा असताना गणित बिघडत आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आणि पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर बंडखोरी अटळ दिसून येत आहे; तर जातिपातीचे राजकारणही आता प्रभावी ठरू लागल्याचे दिसत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तगडे नेते आहेत. या नेत्यांचा जिल्हा त्या राजकारणावर वेगळा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पाथरी मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी ठरल्याने महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना सत्तावीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते.
विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्थानिक पातळीच्या राजकारणावर येऊन ठेपले आहे. युती आणि आघाडीत उमेदवारीवरून घमासान झाले. महायुतीने आमदार राजेश विटेकर यांच्या आई निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली; तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना फेरसंधी दिली. विटेकरांची उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे सईद खान यांनी बंड पुकारले आहे; तर भाजपाचे माधवराव फडही चाचपणी करत आहेत. वरपूडकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारीही भरली. त्यांनी जरांगे-पाटील यांच्याकडूनही उमेदवारीसाठी आंतरवाली सराटीकडे धाव घेतली होती. मात्र फार काही हाती लागले नाही. आतापर्यंत निर्मला गवळी-विटेकर, आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार दुर्राणी यांनी उमेदवारी भरली. मात्र अद्याप कोणत्याही उमेदवारीसंदर्भात शक्तिप्रदर्शन झाले नाही.
जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष या मतदारसंघाकडे लागले असून बंडखोरीमुळे निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे. पाथरी मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेला आला आहे. अंतर्गत बंडाळी टाळण्याचे मोठे आव्हान युती व आघाडीसमोर आहे. मनोज जरांगे यांच्याकडूनही या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याने या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसतो किंवा जरांगे फॅक्टर किती प्रभावी राहतो, हे येणारा काळ ठरवणार आहे.
अवधी कमी आणि मतदारसंघ मोठा
पाथरी मतदारसंघ हा पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी ग्रामीण असा विस्तारलेला आहे. चारही तालुक्यांत एकत्र प्रभाव असणारा एकही नेता या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील नेत्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे.
जातिपातीच्या राजकारणावर भर
पाथरी मतदारसंघांमध्ये ही निवडणूक लोकसभेप्रमाणे जातिपातीच्या राजकारणावर लढवली जात असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या जातीचे किती मतदार याचे अंदाज बांधून त्या-त्या जातीच्या नेत्यांना आपल्याजवळ करण्याचे प्रयत्न सर्वांकडूनच केले जात आहेत.