ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर परभणीतून लढणार; तटकरेंकडून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 04:50 PM2024-03-30T16:50:42+5:302024-03-30T16:52:47+5:30
Parbhani Lok Sabha: महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबत जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र ते नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आज महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणीची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. मात्र महायुतीचं व्यापक हित लक्षात घेत आम्ही ही जागा महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला असून तेच या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.
"राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच रायगडमधून माझी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत आम्हाला सात ते आठ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. मात्र इतर जागांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. परभणीची जागाही आम्हाला सोडण्यात आली होती. परंतु महादेव जानकर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मोठं राजकीय आणि सामाजिक काम आहे. त्यामुळे आम्ही परभणीची जागा त्यांना देण्याचा निर्यण घेतला आहे," असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
"महायुतीतील सर्व पक्षांचे आभार"
परभणी लोकसभा मतदारसंघ रासपला सोडल्याबद्दल महादेव जानकर यांनी महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची सर्व टीम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या सर्वांचा मी ऋणी आहे," असं जानकर यांनी म्हटलं आहे.
राजेश विटेकरांचं नाव होतं चर्चेत
परभणी लोकसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यास राजेश विटेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी जाधव यांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे महायुतीकडून यंदा राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. परंतु आता महादेव जानकरांच्या महायुतीतील समावेशाने विटेकर यांचा पत्ता कट झाला आहे.