पूर्णेत भाविकांसाठी बनला ६० क्विंटलची भाजी आणि ५० क्विंटलच्या भाकरीचा महाप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:09 PM2018-03-30T19:09:37+5:302018-03-30T19:09:37+5:30
गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रेचे.
पूर्णा (परभणी) : गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रेचे. गुरुवारी सायंकाळी जवळपास २५ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
अहेरवाडी (ता पूर्णा) येथे चैत्र महिण्यात दरवर्षी सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीसह जिल्ह्याबाहेरील हजारो भाविक या यात्रेस हजेरी लावतात. गुरुवारी या यात्रेची महाप्रसादाने सांगता झाली.
भाजी-भाकरीच्या प्रसादाला आहे महत्व
भाजी करण्याची तयारी एकदिवस अगोदर पासून असते. गावातील प्रत्येक समाजातील लोक यासाठी योगदान देते. आदल्या दिवशी रात्री गावातून पालखी काढल्या जाते. यात्रेतील वांग्याची भाजी व भाकरीच्या महाप्रसादला अन्यन साधारण महत्व आहे. चार मोठ्या कलयीचा भाजी बनविण्यात वापर झाला तर दीडशे घरातून भाकरी बनवल्या गेल्या. यासाठी ६० क्विंटल वांगी,५० क्विंटल भाकरीच्या पिठाचा उपयोग झाला. २५ हजार भक्तांच्या या महापंगतीस बसवण्यासाठी १० एकर जागा लागली. यावेळी खा. संजय जाधव, आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ. राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्वांसोबत पंगतीत बसून प्रसाद घेतला.