परभणीत युतीचे उमेदवार निश्चित; आघाडीच्या यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 07:01 PM2019-10-02T19:01:54+5:302019-10-02T19:04:17+5:30
आघाडीतील ४ पैकी फक्त एकाच उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे़
- अभिमन्यू कांबळे
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रासपा महायुतीचे चारही उमेदवार जवळपास निश्चित झाले असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ४ पैकी फक्त एकाच उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे़ त्यातही राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित असले तरी पक्षाने संबंधितांची यादी जाहीर केलेली नाही़
परभणीविधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आ़ डॉ राहुल पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यापूर्वी रासपकडे होता़ तर पाथरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता़ नव्या जागा वाटपानुसार गंगाखेडची जागा शिवसेनेला देण्यात आली असून, येथून जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़ पाथरीत भाजपचे आ़ मोहन फड यांना उमेदवारी मिळण्याचे निश्चित असले तरी पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते़
काँग्रेसने पाथरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली़ परभणीची जागा काँग्रेसकडेच असताना येथे मात्र पक्षाने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही़ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिंतूर व गंगाखेड मतदारसंघ आहेत़ या मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे आ़ विजय भांबळे व आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे करीत आहेत; परंतु, राष्ट्रवादीने अद्यापही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली नाही़ असे असले तरी हे दोन्ही उमेदवार पुन्हा मैदानात उतरण्याचे निश्चित आहे़
वंचित बहुजन आघाडीने चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत़ त्यामध्ये गंगाखेडमध्ये काँग्रेसच्या जि़प़ सदस्या करुणा कुंडगीर यांना वंचितने उमेदवारी दिली असून, परभणीत राष्ट्रवादीतून वंचितमध्ये गेलेले शेख मोहंमद गौस यांना तर पाथरीत भारतीय किसानसभेचे पदाधिकारी कॉ़ विलास बाबर यांना उमेदवारी दिली आहे़ जिंतूरमध्ये मात्र मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले मनोहर वाकळे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे़ एमआयएमने परभणीतून राष्ट्रवादीचे नगरसेवक अलीखान मोईनखान यांना उमेदवारी दिली आहे़ २ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील उमेदवारांचे चित्र निश्चित होण्याची शक्यता आहे़
जिंतूरची जागा शिवसेनेकडून रासपकडे
जिंतूर विधानसभेची जागा यापूर्वी शिवसेनेकडे होती ती आता रासपकडे गेली असून, रासपकडून येथे मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़