Maharashtra Bandh : आदिलाबाद - परळी रेल्वेवर आंदोलकांची दगडफेक; नांदेड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:27 PM2018-08-09T14:27:56+5:302018-08-09T14:29:39+5:30
आदिलाबादहून परळीकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर चुडावा ते वसमत दरम्यानच्या रेल्वे फाटकाजवळ आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली.
पूर्णा (परभणी ) : आदिलाबादहून परळीकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर चुडावा ते वसमत दरम्यानच्या रेल्वे फाटकाजवळ आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास प्रवाशांना उतरवून जोरदार दगडफेक करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हाभरात आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. याशिवाय नांदेड- औरंगाबाद या रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही थांबविण्यात आली आहे.
आदिलाबाद- परळी ही पॅसेंजर रेल्वे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास चुडावा- वसमत रस्त्यावरील फाटकाजवळ आली असता काही आंदोलकांनी रेल्वे थांबविली. यानंतर आतील प्रवाशांना खाली उतरवून आंदोलकांनी रेल्वेवर जोरदार दगडफेक केली. यामध्ये रेल्वेच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. दरम्यान, नांदेड- औरंगाबाद रेल्वे मार्गावर आंदोलन होत असल्याने नांदेड- नगरसोल ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे.