महाराष्ट्राचा हिवाळ्यात वीज वापराचा विक्रम; एका दिवसांत वापरली २५ हजार ८०८ मेगावॅट वीज
By प्रसाद आर्वीकर | Updated: January 16, 2025 18:50 IST2025-01-16T18:49:29+5:302025-01-16T18:50:23+5:30
या दिवशी राज्यभरात २५८०८ मेगा वॅट एवढी वीज मागणी नोंदवली गेली. ती महावितरणने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण केली आहे

महाराष्ट्राचा हिवाळ्यात वीज वापराचा विक्रम; एका दिवसांत वापरली २५ हजार ८०८ मेगावॅट वीज
हिंगोली : राज्यात एका दिवसात वापरल्या जाणाऱ्या विजेचा विक्रम मोडला आहे. ११ जानेवारी रोजी राज्यभरातून २५ हजार ८०८ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली, ती महावितरणने अतिरिक्त खरेदी न करता पुरविली. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५४१० मेगावॅट एवढी विक्रमी वीज राज्यभरात वापरली होती.
महावितरण कंपनीच्या वतीने राज्यातील वीजग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. दररोज होणाऱ्या सरासरी मागणीनुसार विजेचे नियोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी वाढते, हिवाळ्यामध्ये मात्र ही मागणी बऱ्यापैकी कमी होते, असा महावितरणचा अनुभव आहे. मात्र ११ जानेवारी रोजी अचानक राज्यात विक्रमी विजेची मागणी नोंद झाली आहे. या दिवशी राज्यभरात २५८०८ मेगा वॅट एवढी वीज मागणी नोंदवली गेली. ती महावितरणने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
महावितरण दिलेल्या माहितीनुसार महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीजपुरवठ्याची जबाबदारी आहे. शनिवारी २५८०८ विजेची मागणी राज्यातून केली. ही मागणी आजपर्यंतची उच्चांकी मागणी ठरली आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५४१० मेगावॅट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५१४४ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला आहे. कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
...अशी उपलब्ध केली वीज
महावितरण कंपनीने राज्यभरात होत असलेली विजेची मागणी लक्षात घेऊन विविध ठिकाणांहून वीज उपलब्ध केली. त्यामध्ये महानिर्मितीकडून ६९९६ मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांकडून ५२५२ मेगावॅट, खाजगी प्रकल्पांकडून ५७३३ मेगावॅट वीज उपलब्ध करण्यात आली. याशिवाय जल विद्युत प्रकल्पातून २००९ मेगावॅट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ३०९३ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पातून २२८ मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पातून २४९८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली असल्याची माहिती महावितरणने दिली.