Maharashtra Election 2019 : परभणीत आघाडी, महायुतीत बंडखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:27 PM2019-10-05T14:27:50+5:302019-10-05T14:28:41+5:30
सर्वात कमी अर्ज पाथरीत , तर सर्वाधिक गंगाखेडमध्ये दाखल - अभिमन्यू कांबळे परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत विविध ...
सर्वात कमी अर्ज पाथरीत, तर सर्वाधिक गंगाखेडमध्ये दाखल
- अभिमन्यू कांबळे
परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत विविध पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे़ परभणीची जागा आघाडीत काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एमआयएमकडून उमेदवारी दाखल केली आहे़ गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेकडे असताना येथे शिवसेना, भाजप, रासपच्या नेत्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे़ तसेच आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना काँग्रेसच्या जि़प़ सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे़ पाथरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपाकडे असताना येथून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ जिंतूरमध्येही महायुतीत बंडखोरी झाली असून, हा मतदारसंघ भाजपकडे असताना येथून शिवसेनेच्या विधानसभा प्रमुखांनी उमेदवारी दाखल केली आहे़ तसेच रिपाइं आठवले गटाच्या राज्य संघटकांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे़
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण ८८ उमेदवारांनी १२५ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये सर्वात कमी अर्ज पाथरीत तर सर्वात जास्त अर्ज गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत़ परभणी मतदारसंघातून अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले़ या मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांचे ३७ अर्ज दाखल झाले आहेत़ त्यामध्ये शिवसेनेकडून आ़ डॉ़ राहुल पाटील, काँग्रेसकडून रविराज देशमुख, अपक्ष सुरेश नागरे यांच्यासह अनेकांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रवादीकडून तर शिवसेनेकडून विशाल कदम यांनी अर्ज दाखल केले़ माजी आ़ सिताराम घनदाट यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली़
पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आ़ मोहन फड, काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर, वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय किसान सभेचे कॉ़ विलास बाबर आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़
जिंतूर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवार
जिंतूर विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी ९ उमेदवारांचे १४ अर्ज दाखल झाले़ या मतदारसंघात एकूण १९ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ़ विजय भांबळे, भाजपाकडून मेघना बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीकडून मनोहर वाकळे यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत़