Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:38 AM2019-10-08T11:38:44+5:302019-10-08T11:41:08+5:30
बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
- अभिमन्यू कांबळे
परभणी : जिल्ह्यातील चार मतदारसंघात शिवसेना- भाजप महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
परभणी मतदारसंघात १२ जणांनी आपले अर्ज परत घेतल्याने १५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे मोहंमद गौस झैन आणि एमआयएमचे अली खान यांच्यात होत आहे. एमआयएमचे अलीखान हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून परभणीची जागा काँग्रेसकडे असताना त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. परभणी मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या चाँद सुभाना जाकेर खान यांचे पती जाकेर अहेमद खान मोईन अहेमद खान यांनी मात्र माघार घेतली आहे.
गंगाखेडमध्ये ८ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे, युतीचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचितच्या करुणा कुंडगीर आणि अपक्ष माजी आ.सीताराम घनदाट या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. येथे महायुतीत फूट पडली आहे. गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटली असताना रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे बालासाहेब निरस यांनी मात्र येथून माघार घेतली. आघाडीत काँग्रेसच्या जि.प.सदस्या करुणा कुंडगीर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली. ती कायम ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. केंद्रे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
पाथरीतही महायुतीत बंडखोरी झाली. ही जागा भाजपकडे असताना येथून सेनेचे डॉ.जगदीश शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आ. फड यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुंजाजी कोल्हे, माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, डॉ.राम शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी आपले अर्ज परत घेतले आहेत.
जिंतूरमध्ये चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे खंडेराव आघाव आदींचा समावेश आहे. आता येथे भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आ. विजय भांबळे, शिवसेनेचे बंडखोर राम खराबे, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे आदी प्रमुख उमेदवार १३ जण रिंगणात आहेत. शिवसेनेचे राम खराबे यांनी उमेदवारी कायम ठेवली. २०१४ ची विधानसभा खराबे यांनी सेनेकडून लढली होती. यंदा त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला; परंतु, त्यांनी उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम राहिले.
रत्नाकर गुट्टे जेलमधून लढणार
परभणीच्या कारागृहात असलेले रासपचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडमधून रासपकडून उमेदवारी दाखल केली आहे. या जागेवर शिवसेनेचे विशाल कदम हे लढत आहेत. त्यामुळे सोमवारी गुट्टे हे माघारी घेतील, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांनी माघार घेतली नाही व अर्ज कायम ठेवला.त्यामुळे आता गुट्टे हे कारागृहात राहूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे जावई तथा रासप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्या खांद्यावर आहे.