महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 09:04 PM2019-10-11T21:04:09+5:302019-10-11T21:06:25+5:30

Maharashtra Election 2019 : हक्काची जागा गेली भाजपाला 

Maharashtra Election 2019 :Unrest in Shiv Sena due to unwell in Mahayuti | महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता

महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता

Next
ठळक मुद्देमिळालेल्या जागेवरही लागला कस

- अभिमन्यू कांबळे 

परभणी : राज्यस्तरावर शिवसेना-भाजपा मित्र पक्षांची महायुती झाली असली तरी या महायुतीत परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला दगाबाजी आली आहे. सेनेची हक्काची पाथरीची जागा भाजपाकडे गेली तर तडजोडीत वाट्याला आलेल्या गंगाखेडच्या जागेवर महायुतीतील घटक पक्ष रासपमुळे सेनेच्या विजयाच्या वाटेत काटे आले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेला भाजपसोबत जागा वाटप करताना तडजोडी कराव्या लागल्या असल्याचे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय परभणी जिल्ह्यात सेनेला येऊ लागला आहे. जिल्ह्यात २०१४ पर्यंत युतीतील जागा वाटपानुसार परभणी, जिंतूर व पाथरी या तीन जागा शिवसेनेकडे होत्या. गंगाखेडची जागा भाजपाकडे होती. २०१४ च्या निवडणुकीत गंगाखेडची जागा भाजपाचा मित्र पक्ष रासपने लढविली. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने पाथरीची जागा आपल्याकडे कायम रहावी, यासाठी पुरेपुर प्रयत्न केले.  

या मतदारसंघात  शिवसेनेने १९९०, १९९५, १९९९ आणि २००९ असा चारवेळा  विजय मिळविला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची मोठी व्होटबँक आहे. त्यामुळे ही जागा सेनेकडेच कायम रहावी, अशी मागणी खा.बंडू जाधव यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. शिवाय निवडणूक लढविण्यासाठी तगड्या उमेदवारांनीही पक्षश्रेष्ठींकडे मुलाखती दिल्या होत्या; परंतु, राज्यस्तरावरील वाटाघाटीत पाथरीची जागा भाजपाकडे गेली. येथून आ.मोहन फड हे २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने मुख्यमंत्र्यांनी ही जागा सेनेकडून भाजपाकडे सोडवून घेतली. त्या बदल्यात गंगाखेडची भाजपची जागा शिवसेनेला देण्यात आली. महायुतीच्या जागा वाटपात तसे जाहीरही करण्यात आले. 

पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय प्रमाण मानून शिवसेनेने हक्काची पाथरीची जागा सोडून गंगाखेडमध्ये बस्तान बसविले. येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. रासपच्या वाट्याला आलेल्या राज्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपने दगाबाजी केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आणि गंगाखेडमधून रासपचा उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४ आॅक्टोबर रोजी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांचा रासपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला. गुट्टे यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला असल्याने त्यांच्या नावासमोर रासपचा नामोल्लेख झाला. त्यामुळे या मतदारसंघात महायुती भंगली. महायुतीतील दोन घटकपक्ष एकमेकांसमोर आले. त्यामुळे शिवसेनेची अस्वस्थता वाढली.

 खा.बंडू जाधव यांनी परभणीत पत्रकार परिषद घेऊन राज्यस्तरावर या संदर्भात निर्णय होईल, असे सांगितले होते; परंतु, राज्यपातळीवर याबाबत रासपवर दबाव टाकण्यास शिवसेनेचे नेते अपयशी ठरले. शिवाय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. परिणामी गुट्टे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. या सर्व घडामोडीत जिल्ह्यात शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झाली. एकतर हक्काची पाथरीची जागा भाजपाकडे गेली आणि तडजोडीत मिळालेल्या गंगाखेडच्या जागेवर मित्र पक्षाचा उमेदवार कायम राहिला. परिणामी आता शिवसेनेच्या नेत्यांना या जागेवर यश मिळविण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. महायुतीत भाजपाकडून दगाबाजी झाली असली तरी शिवसेनेला नाईलाजाने हे सहन करावे लागत असल्याचे चित्र गंगाखेड  विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.

मित्रपक्षामुळेच सेनेच्या वाटेत आले काटे; वरिष्ठांची चुप्पी
- परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेने तब्बल चारवेळा विजय मिळविला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली ताकद निर्माण केली. तोच मतदारसंघ वरिष्ठांच्या तडजोडीत मित्र पक्षाला गेला आणि जो मतदारसंघ मिळाला, त्याततही काटे आले. हे काटे दूर करण्याचे काम पाथरीची जागा भाजपासाठी सोडून घेणाऱ्या नेत्यांनी करणे आवश्यक होते; परंतु, ऐन वेळी हे नेते नामनिराळे झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. 
- विशेषत: पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीचा धर्म म्हणून भाजपाचे काम करीत असल्याचे सांगत असले तरी खाजगीत मात्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला आलेला अनुभव आणि आता विधानसभेला झालेली दगाबाजी ही सच्च्या शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. विशेषत: खा.बंडू जाधव हेही अस्वस्थ आहेत. परभणीत खा.जाधव यांचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्याशी फारसे सख्य नाही. त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना तिकीट मिळवून देण्यापासून खा.जाधव यांनी बरीच मेहनत घेतली. त्यात त्यांना यश आले; परंतु, रासपच्या उमेदवारामुळे त्यांच्या हा आनंद फार दिवस टिकला नाही. 
- जिल्ह्यात आता शिवसेनेच्या हक्काची एक जागा कमी झाली व राहिलेल्या दोन पैकी एका जागेत संघर्ष करावा लागत असल्याने शिवसैनिकांची अस्वस्था वाढली आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 :Unrest in Shiv Sena due to unwell in Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.