गंगाखेडात महाविकास आघाडीला धक्का;तीन मते फुटली,सभापदीपदी रासपकडून साहेबराव भोसले
By मारोती जुंबडे | Published: May 23, 2023 05:18 PM2023-05-23T17:18:02+5:302023-05-23T17:18:38+5:30
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १० व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या रासपाचे ८ सदस्य निवडून आले होते.
गंगाखेड: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहूमत असतांनाही तीन संचालक फुटल्याने सभापतीपदी रासपकडून साहेबराव भोसले यांची तर उपसभापतीपदी संभाजी पोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने बाजार समितीवर आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचे वर्चस्व राहिले.
गंगाखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहात रासप व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे ८ संचालक आणी महाविकास आघाडीचे ३ असे एकूण ११ संचालक उपस्थित होते. यात महाविकास आघाडीचे साहेबराव भोसले, सुशांत चौधरी,मनकर्णाबाई घोगरे यानी रासपच्या संचालकासोबत गेल्याने महाविकास आघाडीत फुट पडली. महाविकास आघाडीचे ७ सदस्य या निवडणूक प्रक्रियेस गैरहजर राहिले.यावेळी सभापती पदासाठी साहेबराव भोसले, उपसभापती पदासाठी संभाजी पोले यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी बालासाहेब निरस, संभाजी पोले, कविता सावंत, शंभूदेव मुंडे, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत काबरा, प्रमोद धुळे, माणिकराव आळसे यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत ढोल- ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गंगाखेड शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
सात सदस्य राहिले गैरहजर
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १० व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या रासपाचे ८ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे १० जागा असल्याने सभापती व उपसभापतीपदी आघाडीचे सदस्य निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र ती मंगळवारी फोल ठरली. महाविकास आघाडीचे ३ सदस्य आमदार गुट्टे यांच्या सोबत गेल्याने महाविकास आघाडीत फूट पडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अभय कुंडगीर, भगवान सानप, कांताबाई जाधव, उद्धव सातपुते, उमाकांत कोल्हे, नारायण देशमुख, सिद्धांत भालके हे सात सदस्य मात्र विशेष सभेस अनुपस्थित राहिले.