५६ ग्रामपंचायतींमध्ये ‘माहिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:12+5:302021-02-17T04:22:12+5:30
सेलू तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येक दोन ग्रामपंचायतींकरिता एक अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती केली होती. ८ ते ...
सेलू तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येक दोन ग्रामपंचायतींकरिता एक अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती केली होती. ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान ६७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडप्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंचपदासाठी ५४ ठिकाणी बिनविरोध निवड झाली, तर ११ ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली. त्यापैकी एक ठिकाणी गुप्त मतदान घेण्यात आले, तर दोन ठिकाणी सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज न आल्याने तेथील सरपंचपद हे रिक्त राहिले आहे.
तसेच ५६ ठिकाणी उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली, तर ११ ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली. त्यापैकी दोन ठिकाणी गुप्त मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. एकंदरित ६७ पैकी ५६ ग्रामपंचायींमध्ये सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत. ३६ ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच होण्याचा बहुमान महिलांना मिळाला आहे.
काठावर बहुमत आलेल्या ग्रामपंचायतीत महिलांची संख्या अधिक असल्याने सभागृहात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पॅनलप्रमुखांच्या छातीत मात्र धडधड कायम होती.
या गावात झाली निवडणूक
सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव, वालूर, खवणे पिंपरी, हादगाव खु, खादगाव, तिडी पिंळगाव, नागठाणा, खेर्डा, बोरगाव जहाँगीर या ठिकाणी सरपंच व उपसरपंचासाठी निवडणूक झाली आहे.
दोन ठिकाणी सरपंचपद रिक्त
सेलू तालुक्यातील राजा व राजवाडी येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झाले होते, परंतु येथे या प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने नामनिर्देशन न आल्यामुळे या दोन ठिकाणी सरपंचपद हे रिक्त राहिले आहे. तसेच सेलू तालुक्यातील निरवाडी बु. येथे सरपंचपदी आनिल दिनकर वांढेकर ( २४), तर गिरगाव खु. येथे सरपंचपदी विजयमाला विष्णू झिंबरे (२५) अशाप्रकारे हे दोन तरुण सरपंचपदी विराजमान झाले आहेत.