परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 02:04 PM2021-02-19T14:04:48+5:302021-02-19T14:05:48+5:30
untimely rains in Parbhani district परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली.
परभणी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहु आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरुच होत्या. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिंतुर तालुक्यातील येलदरी, सावंगी म्हाळसा, माणकेश्वर, आंबरवाडी, किन्ही, सावळी, घडोळी, मुरूमखेडा, हिवरखेडा, सावळी, केहाळ भागात तसेच मानवत तालुक्यातील मानोली, रामपूरी पालम तालुक्यातील बनवस आदी परिसरातील गव्हाच्या पिकाचे तसेच हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतात गहू, हरभरा आदी पिके काढण्याचे काम सुरु आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेली ही पिके भिजून गेली.
जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळीही महसूल विभागाकडे जिल्ह्यात ८.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यात परभणी तालुक्यात ७.४ मिमी, गंगाखेड तालुक्यात ५.६ मिमी., पाथरी तालुक्यात १२.८ मिमी., जिंतूर तालुक्यात ६.४ मिमी, पूर्णा तालक्यात ४.३ मिमी, पालम तालुक्यात ३.९ मिमी, सेलू तालुक्यात ९.८ मिमी, सोपेठ तालुक्यात १२.८, आणि मानवत तालुक्यात ७.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.