विश्वासात घेऊनच निर्णय घ्या; परभणी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या सदस्यांना आमदारांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:33 PM2018-01-17T14:33:31+5:302018-01-17T14:36:09+5:30
जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आहे.
परभणी : जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्यही नाराज असल्याचे समोर आले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर १६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या तिन्ही आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस राष्ट्रवादीचे सर्व २४ सदस्य उपस्थित होते.
तिन्ही आमदारांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यानंतर निधी वाटपाबाबत अन्याय होऊ दिला जाणार नाही. जि.प.ला आधीच निधी कमी आहे. जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. सदस्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखावा. प्रत्येकाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, सदस्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे मांडा, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषदेच्या निधी वाटपासंदर्भात सर्व प्रथम समित्यांना प्राधान्य दिले जावे. तसेच राष्ट्रवादीचे सदस्य, भाजपा, रासपचे सदस्य अशा क्रमाने निधी वाटप करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीनंतर तीनही आमदारांनी भाजप, रासप व अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीतही निधी वाटपाविषयी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांची बैठक घेऊन या सदस्यासमवेतही चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि शिवसेच्या सदस्यांनी समान निधी वाटप करावे, अशी मागणी केली. त्यात ७० टक्के सदस्य आणि ३० टक्के समिती असा निधी वाटपाचा प्राधान्यक्रम ठेवावा, अशी मागणी केली. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. या बैठकीस शिवसेना काँग्रेसच्या १९ सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते. आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे आणि आ.डॉ.मधुसुदन केंद्रे यांनी मंगळवारी सर्व नाराज सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यामुळे पुढील बैठकीपूर्वी निधी संदर्भात कशा पद्धतीने निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.