मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती केली १ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:23 PM2017-12-19T19:23:56+5:302017-12-19T19:24:21+5:30
मानवत ( परभणी ): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५ हजार १०० ...
मानवत (परभणी ): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५ हजार १०० रुपये भाव मिळाला आहे़ आतापर्यंत १ लाख ७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद मानवत बाजार समितीकडे झाली आहे़
मानवत तालुक्यात यावर्षी बहुतांश शेतकर्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे़ जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली आली होती़ त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती़ परंतु, शेतकर्यांनी उपलब्ध पाण्यावर कापसाला जगविले़ त्यामुळे कापसाला बोंडे प्रचंड लागली होती़ सुरुवातीच्या दोन वेचण्या चांगल्या झाल्या़ त्यानंतर मात्र परतीचा पाऊस चांगला झाला़ मात्र यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात झाला़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ पहिल्या दोन वेचण्यांमध्ये चांगला कापूस निघाल्याने शेतकर्यांनी मानवत बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल करण्यास सुरुवात केली आहे़
शासनाने हमीभाव जाहीर केले़ मध्यम धाग्याच्या कापसाला ४ हजार ३२० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित केला़ मानवत येथे ९ नोव्हेंबरपासून बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाच्या लिलावास सुरुवात झाली. हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत़ कापूस विक्रीनंतर लगेच नगदी पैसे मिळत असल्याने परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यातील शेतकरी मानवत बाजारपेठेमध्ये येत आहेत़ येथील खाजगी परवानाधारक खरेदीदारांसह सीसीआयने १५ डिसेंबरपर्यंत १ लाख ७ हजार ७७० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे़ येथील बाजारपेठेतील चित्र पाहता आगामी काळामध्ये कापसाचा दर वाढणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने यावर्षी बोंडअळीने नुकसान होवूनही कापूसच शेतकर्यांना तारेल, अशी शक्यता सध्या तरी दिसून येत आहे़
खरेदीसाठी चुरस वाढली
शासनाचा हमीभाव ४ हजार ३२० रुपये असला तरी खुल्या बाजारात कापूस खरेदी करण्याचे आदेश धडकल्याने सीसीआयचे केंद्रप्रमुख पवार यांनी खुल्या बाजारात कापूस खरेदीला सुरुवात केली़ १५ डिसेंबरपर्यंत सीसीआयने ४ हजार ९०० क्विंटल कापसाची खरेदी केली़ सीसीआय खरेदीसाठी मैदानात उतरल्याने कापूस खरेदीसाठी चुरस वाढली आहे़ दरम्यान, अटींची पूर्तता व कापूस विक्री केल्यानंतर पैशांसाठी वाट पहावी लागत असल्याने अनेक शेतकरी खाजगी व्यापार्यांना माल विक्री करून नगदी पैसे घेण्याला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे़
५ हजार १०० रुपयांचा मिळाला
मानवत बाजार समितीमध्ये आतापर्यंत ५ हजार १०० रुपये कमाल तर ४ हजार ७०० रुपये किमान भाव मिळाला आहे़ शनिवारी झालेल्या लिलावात सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख पवार, गिरीष कत्रुवार, विजय पोरवाल, भगवान गोलाईत, संदीप पेन्शनलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवाणी, रामनिवास सारडा, जुगल काबरा आदी खरेदीदार सहभागी झाले होते़
कापसाला चांगला भाव मिळत आहे
मानवत येथील बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे़ शेतकर्यांनी आपला कापूस परस्पर विक्री न करता लिलावात आणून विक्री करावा़
-गंगाधरराव कदम, सभापती