तपोवन थांबणार नसल्याने मानवतकर संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 03:43 PM2020-10-09T15:43:02+5:302020-10-09T15:43:50+5:30
तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मानवत : अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून आता तपोवन एक्सप्रेस ही विशेषरेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील सहा महिन्यांपासून रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपोवन सुरू होणार असलयाने मराठवाड्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अपेक्षित स्थानकांवर रेल्वे थांबणार नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
विशेष तपोवन एक्सप्रेस मुंबई ते हुजूर साहेब नांदेडपर्यंत दररोज धावणार आहे. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा येथे थांबा असल्याचे मध्य रेल्वे विभागाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे. या निर्णयाचा फटका मानवत तसेच पाथरी तालुक्यातील रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.
या तालुक्यातील प्रवाशांना मुंबई गाठायचे असल्यास सेलू, किंवा परभणी रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडावी लागणार आहे. सेलू रेल्वेस्थानक मानवत येथून ३१ किमी तर परभणी रेल्वे स्थानक ३२ किमी आहे. या दोन्ही रेल्वेस्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना आर्थिक फटक्यासह मानसिक तसेच शारीरिक त्रासही सहन करावा लागणार आहे. यामुळे तपोवन एक्सप्रेसला मानवत रोड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी पाथरी आणि मानवत तालुक्यातील नागरिकांनी केली.