मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक
By मारोती जुंबडे | Published: February 16, 2024 07:18 PM2024-02-16T19:18:27+5:302024-02-16T19:18:35+5:30
वनविभागाची कारवाई; ८० लाखांचे मांडूळ साप जप्त
परभणी: मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांना परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून ३ किलो १० ग्रॅम वजनाचे साप जप्त केल्याची कारवाई केली. यामध्ये तलाठ्यासह अन्य तीन आरोपींचा समावेश आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर चव्हाण यांनी वन कर्मचाऱ्यांसह सापळा रचून मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या चार व्यक्तींना अटक केली. या व्यक्तीकडून चारचाकी वाहनासह तीन किलो दहा ग्रॅमचे मांडूळ साप जप्त करण्यात आले. त्यानंतर या आरोपींना प्रथम सत्र न्यायालयात उभे केले. न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत त्यांना वन कोठडी सुनावली होती. या आरोपीमध्ये तलाठी राजेश्वर स्वामी (रा. शेळगाव ता. सोनपेठ), रोहिदास वैरागर (रा. तारपांगडी जि. परभणी), संतोष पवार (रा. सरस्वती नगर, हिंगोली), गजानन गडदे (रा.सेनगाव) या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वनपरिक्षेत्राधिकारी ऋषिकेश चव्हाण हे करीत आहेत.
मांडूळ सापाला सोडले नैसर्गिक अधिवासात
आरोपींकडून मांडूळ साप तपासणीसाठी पशु विकास अधिकारी डॉ. लक्ष्मण कनले, डॉ. अजय धमगुंडे यांच्याकडे पाठविण्यात आले. मांडूळ साप वन्यप्राणी हा सुदृढ अवस्थेत असून न्यायालयाने मांडूळ साप वन्यप्राण्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
समाजातील अंधश्रद्धेमुळे तस्करी
वन्य प्राण्यांची तस्करी समाजामधील अंधश्रद्धेमुळे होत असल्याचे विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश शिंदे, वनपाल के. एस. भंडारे, बालाजी दुधारे, के. एम. थोरे, आर.डी. खटिंग, अमीर शेख, गणेश करे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.