आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला ; परभणी जिल्ह्यात विविध मार्गाने आंदोलन सुरुच
By राजन मगरुळकर | Published: October 28, 2023 06:59 PM2023-10-28T18:59:30+5:302023-10-28T18:59:52+5:30
अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.
परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाभरात मागील चार दिवसांपासून विविध गावांमध्ये आंदोलन, गावबंदी, साखळी उपोषण, बेमुदत ठिय्या सुरू आहे. अनोख्या प्रकारे आंदोलन करुन प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावात शुक्रवारी कॅन्डल मार्च काढून पाठिंबा दिला.
आधी मराठा आरक्षण, नंतर शिक्षण म्हणत पाथरी तालुक्यातील वाघाळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्कलनिहाय सुरु असलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणस्थळी दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. जिंतूर शहरात मराठा समाजातील महिलांनी शुक्रवारी रात्री कँडल मार्च काढला. परभणी शहरात साखळी उपोषण दूसऱ्या दिवशीही सुरु होते. सेलू शहरात लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सामूहिक साखळी उपोषण सुरू आहे. विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यासह येथील चार आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध मार्गाने हे आंदोलन सुरु आहे.