Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार भांबळे यांच्या घरासमोर आंदोलकांचा भजन करून ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:49 PM2018-08-02T14:49:05+5:302018-08-02T14:50:15+5:30
मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले.
जिंतूर (परभणी ) : मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यात सलग दहाव्या दिवशी आंदोलन सुरु आहेत. आज सकाळी सकाळी 10 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर २ तास भजन म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात केले. आंदोलकांनी आमदार भांबळे यांनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार भांबळे येथे नसल्याने त्यांचे वडील माजी राज्यमंत्री माणिकराव भांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आम्ही समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
यानंतर शहरातून टाळ मृदंगाच्या गजरात घोषणाबाजी करत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढाला. या आंदोलनात महिलांसह गावागावातील भजनी मंडळ सहभागी झाले होते.