Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद; परभणी जिल्ह्यात पालकांनी छेडले अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:03 PM2018-08-02T14:03:47+5:302018-08-02T14:06:06+5:30
सारोळा (बु.) येथील मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन एक वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन छेडले आहे.
पाथरी (परभणी ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सारोळा (बु.) येथील मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन एक वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन छेडले आहे.
सारोळा (बु.) येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवी पर्यंत शाळा आहे. गावातील मराठा समाजाच्या मुलांचा याच शाळेत प्रवेश आहे. येथील पालकांनी गटविकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षण अधिकारी यांना बुधवारी एक निवेदन दिले. निवेदनात २ ऑगस्ट पासून मराठा आरक्षण लागू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकांनी नमूद केले.
यानुसार आजपासून मराठा समाजाच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. यामुळे आज शाळेत ७२ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. या शाळेत १ ली ते ८ वी ११८ विध्यार्थी आहेत. बुधवारी शाळेत ११६ विद्यार्थी उपस्थित होते. आज आंदोलन सुरू झाल्यानंतर ११८ पैकी केवळ ३३ विध्यार्थी शाळेत आली. उर्वरित मराठा समाजाची ८५ विध्यार्थी शाळेत आलेच नाही.
शाळा बंद आंदोलन टाकलगव्हान येथेही
सारोळा (बु.) प्रमाणे तालुक्यातील टाकलगव्हान येथेही याच प्रमाणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. दुपारी १ नंतर येथील पहिली ते पाचवी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळेत येऊन पालकांनी मुलांना घरी नेले. मराठा आरक्षण लागू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार पालकांनी केला असून या विषयीचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.