मराठवाडा ऐतिहासिक अवशेषांची खाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:37 PM2020-01-14T19:37:48+5:302020-01-14T19:40:06+5:30
२ हजार वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे, दीपस्तंभ, पुरातन काळातील उत्कृष्ट बांधकाम कलेचा नमुना मराठवाड्यात
जिंतूर (जि़परभणी) : युरोपच्या धर्तीवर मराठवाड्यात टुरिझम मार्केटिंगसाठी मोठा वाव आहे़ २ हजार वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे, दीपस्तंभ, पुरातन काळातील उत्कृष्ट बांधकाम कलेचा नमुना मराठवाड्यात असताना पुरातत्व विभागाचे मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, अशी खंत चारठाणा हेरिटेजच्या निमित्ताने इतिहासतज्ज्ञांनी १२ जानेवारी रोजी व्यक्त केली़
तालुक्यातील चारठाणा येथे रविवारी हेरिटेज वॉक्चे आयोजन केले होते़ चारठाणा येथे यादवकालीन ३६५ मंदिरे असून, दीपस्तंभ, पुष्कर्णी तीर्थ हे यादवकालीन कलाकृतीचे उत्कृष्ट नमुने आहेत़ या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला़ या कार्यक्रमासाठी विदेशी पर्यटक तथा उद्योजक, फ्रेंंच अभ्यासक व्हिन्सेंट पास्केनल्ली, डॉ़ प्रभाकर देव, ब्राझीलचे विद्यार्थी मार्कोस, मेलीन, लोचसी यांच्यासह डॉ़ दुलारी गुप्ते, रफत कुरेशी, प्रा़ सुरेश जोंधळे, चित्रकार सरदार जाधव, श्रीकांत उमरीकर, मल्हारीकांत देशमुख, पर्यटन अभ्यासक आकाश हुमणे, माधुरी गौतम, मेधा पाध्ये, प्राचार्य चंद्रकांत पोतदार, ह़भ़प़ नामदेव महाराज ढवळे, ह़भ़प़ शिवआप्पा खके, जि़प़ सदस्या मीनाताई राऊत, आदींची उपस्थिती होती़
युरोपमध्ये इतिहासकालीन अवशेष पर्यटकांना दाखविले जातात़ मुळात आंतरराष्ट्रीय व्यापार हा हेरिटेज मार्केटींगवर अवलंबून आहे़ आपला देश मात्र टुरिझम मार्केटींगपासून दूर आहे़ मराठवाड्यात सर्वात जास्त प्राचीन ऐतिहासिक शिल्पकला, हस्तकला, यादवकालीन कलाकृती उपलब्ध आहेत़ मराठवाडा ही आवशेषांची खाण असून, ही संपत्ती जपली पाहिजे़ चारठाणा येथील यादवकालीन पुष्कर्णीतीर्थ, दीपस्तंभ व ३६५ मंदिरांच्या रुपाने मराठवाड्यात सोन्याची खाण असून, त्याचे संगोपन होणे आवश्यक आहे़ यासाठी शासनाबरोबरच नागरिकांनीही पुढे यावे, असे मत इतिहासतज्ज्ञ डॉ़ प्रभाकर देव यांनी व्यक्त केले़
हेरिटेज वॉकमध्ये चारठाणा
येथील गोकुळेश्वर मंदिर, पुष्कर्णीतीर्थ, दीपस्तंभ, कसबा गणपती मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, खुरांच्या आईचे मंदिर, नृसिंह तीर्थ आदी ठिकाणांना भेट देण्यात आली़