संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:26 PM2017-11-22T17:26:23+5:302017-11-22T17:29:10+5:30
माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सोनपेठ (परभणी ) : माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आज दुपारी वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सोनपेठ येथील नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाचे आज लोकार्पण झाले. यावेळी मंचावर महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंञी पंकजा मुंडे, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, आमदार मोहन फड, बाबाजानी दुर्राणी, हरिभाऊ राठोड, माजी. जि.प अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष जिजाबाई राठोड, चंद्रकांत राठोड, बाळासाहेब रोकडे, अभय चाटे, विठ्ठल रबदडे आदींची उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मला वंचीत व दुर्बल घटकाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे ती मी शेवटच्या श्वासापर्यंत निभावणार. यामुळेच माझा जन्म जरी बीड जिल्ह्यातील असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे असे मी मानते.
मराठवाड्याचा विकास करणार
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करणे, वाटरग्रीड मंजूर करून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. यासोबतच गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. ती या वेळीही होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी मकरंद अनासपुरे, मोहन फड, हरिभाऊ राठोड, राजेश विटेकर, चंद्रकांत राठोड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी केले तर सुञसंचालन व आभार मधूकर उमरीकर यांनी मानले.