मराठवाडी बोली ही प्रमाण मराठीची जननी ठरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:41+5:302021-01-22T04:16:41+5:30
परभणी : भाषा परिवर्तनशील असते. नवनवे बदल तिच्यात होतात ते तिच्या जिवंतपणाचे लक्षण असते. मराठवाडी बोलीमध्ये जे शब्दभांडार ...
परभणी : भाषा परिवर्तनशील असते. नवनवे बदल तिच्यात होतात ते तिच्या जिवंतपणाचे लक्षण असते. मराठवाडी बोलीमध्ये जे शब्दभांडार आहे, त्यावरून असे वाटते की मराठवाडी बोली हीच प्रमाण मराठीची जननी असावी, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक डॉ.विठ्ठल जंबाले यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषिक संवर्धन पंधरवडाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत जंबाले बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर उपस्थित होत्या. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख डॉ रोहिदास नितोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठल जंबाले म्हणाले, मराठी भाषा व साहित्य यास दोन हजार वर्षाचा वारसा आहे. अनेक देशांत मराठी भाषा पोहोचली आहे. कोणत्याही भाषेची मालकी ही जनतेची असते. त्यामुळे संरक्षणाची जबाबदारीही त्या त्या भाषकांची असते; त्याप्रमाणे मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी मराठी भाषकांची म्हणजे तुमची आमची आहे. मराठी भाषेची विविध विकास टप्पे उलगडत त्यांनी सीमावर्ती मराठी बोली, गावगाड्यातील बोली, व्यावसायिकांची बोली यामधील शाब्दिक उच्चारानुसार असणारे सूक्ष्म बारकावे सांगत खऱ्या अर्थाने ग्रामीण माणसाने त्या बोलीचे संवर्धन केले आहे, असे सांगितले. प्रा. प्रल्हाद भोपे यांनी प्रास्ताविक केले. डॉ राजू बडूरे यांनी सूत्रसंचालन केले. मीनाक्षी पारपेल्ली यांनी आभार मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने सहभागी झाले होते.