विवाह, मुंज, सत्यनारायण, तेरवीही ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:12+5:302021-06-23T04:13:12+5:30

कोरोनाने सर्वच क्षेत्रांतील व्यवसायाचे स्वरुप बदलले आहे. त्याला पुजारीसुद्धा अपवाद नाहीत. धार्मिक विधी, मंगलकार्य, पूजापाठ, सप्ताह या कार्यक्रमांना पुजारी ...

Marriage, Munj, Satyanarayana, Teravi also online | विवाह, मुंज, सत्यनारायण, तेरवीही ऑनलाईन

विवाह, मुंज, सत्यनारायण, तेरवीही ऑनलाईन

Next

कोरोनाने सर्वच क्षेत्रांतील व्यवसायाचे स्वरुप बदलले आहे. त्याला पुजारीसुद्धा अपवाद नाहीत. धार्मिक विधी, मंगलकार्य, पूजापाठ, सप्ताह या कार्यक्रमांना पुजारी अनिवार्य असतात; परंतु कोरोनाने मागील वर्षभरात मंगल कार्यालय, मंदिरे बंद असल्याने धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. महाशिवरात्र, पाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, अक्षयतृतीया यासारखे मोठे सण, उत्सव मागील चार महिन्यांत झाले. परंतु या सर्व उत्सवाच्या वेळी कोरोनाचे निर्बंध होते. त्यामुळे हे सण, उत्सव मंदिरात छोट्या प्रमाणावर साजरे झाले तसेच मागील एक महिन्यात काही लग्नतिथी होत्या; परंतु, लग्नाच्या उपस्थितीला बंधने घालण्यात आल्याने अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळे घरच्या घरी साजरे झाले. पुजाऱ्यांच्या नेहमीच्या कामांना कोरोनाचा फटका बसल्याने अनेक पुजाऱ्यांनी यजमानाच्या पूजेसाठी वेळ, तारीख, तिथी ठरवून ऑनलाईन पूजा सांगितली.

सध्या हे विधी केले जात आहेत ऑनलाईन

नामकरण सोहळा, श्राद्ध, गंगेवरील होणारे तेरवीचे कार्यक्रम, वास्तुशांती, सत्यनारायण, मुंज, साखरपुडा, लग्न, सत्यनारायण, सत्यअंबा आणि शांती, जप, पत्रिका पाहणे असे अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरे केले जात आहेत.

पूजेला आल्यावरही मास्क

शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या वैयक्तिक तसेच सामूहिक धार्मिक कार्यक्रमांना जाणारे पुजारी मास्क घालून पूजापाठ सांगत आहेत. यजमानाकडे असलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून आवश्यक असेल तरच विधीची पूजा सांगण्यासाठी पुजारी जात आहेत. हेच काम न जाताही होत असेल तर ऑनलाईन पद्धतीने पूजा सांगून नियम पाळले जात आहेत.

काय म्हणतात विधी करणारे

कोरोनाने मागील वर्षभरापासून व्यवसाय ठप्प पडला आहे. दररोजचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे मिळेल ते काम करावे लागत आहे. काही घरातील दररोजच्या देवाची पुजाऱ्यांमार्फत केली जाणारी पूजा कोरोनामुळे ग्राहकांनी बंद केली आहे. त्याचाही फटका पुजाऱ्यांना बसला आहे.

- नीलेश जोशी, शंकतीर्थकर.

कोरोनाने अनेकांचे व्यवसाय ऑनलाईन झाले आहेत. पूजापाठ करणारे अनेक गुरुजीसुद्धा आता हायटेक झाले आहेत. सत्यनारायण आणि अन्य काही विधीसाठी मोबाईलवरून पूजा सांगितली जात आहे. मागील चार सहा महिन्यांत अशा अनेक पूजा या पद्धतीने केल्या आहेत.

- श्रीपाद गुरू धर्माधिकारी.

Web Title: Marriage, Munj, Satyanarayana, Teravi also online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.